India vs Bangladesh: आशिया चषक स्पर्धेतील सलग पाचव्या विजयासह भारतीय संघाने फायनलमध्येे प्रवेश केला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघानं बांगलादेशच्या संघासमोर १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १२७ धावांवर आटोपला. टीम इंडियाने ४१ धावांनी विजय नोंदवत फायलमध्ये धडक मारली. या निकालानंतर आता बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरमधील लढतीला सेमीच स्वरुप आले आहे. यातील विजेता संघ २८ सप्टेंबरला टीम इंडियाविरुद्ध फायनल खेळताना दिसेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेक शर्मा अन् गिलचा पुन्हा दिसला जलवा
बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पुन्हा एकदा धमाकेदार खेळीचा नजराणा पेश केला. या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली. गिल २९ धावा करून परतल्यावर अभिषेक शर्मानं ३७ चेंडूत ७५ धावांची धमाकेदार खेळी केली. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने २९ चेंडूत ३८ धावा केल्यामुळे भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १६८ धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून रिशाद हुसेन याने सर्वाधिक २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय सैफुद्दीन, मुस्ताफिझुर आणि तंझिम यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
कुलदीपनं घेतल्या सर्वाधिक विकेट्स, बांगलादेशकडून सैफ एकटा पडला
भारतीय संघाने सेट केलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना बांगलादेश संघाची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराने आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर संघाला पहिले यश मिळवून दिले. सलामीवीर सैफ हसन याने एका बाजूनं दमदार अर्धशतक झळाकवले. पण दुसऱ्या बाजूनं त्याला परवेझ इमॉन याने २१ धावा करत दिलेली साथ वगळता अन्य कुणाचीही साथ मिळाली नाही. सैफनं ५१ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. बांगलादेशच्या अन्य एकाही बॅटरला दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, बुमराह आणि चक्रवर्तीने प्रत्येकी २-२ तर अक्षर पटेल आणि तिलक वर्मा याने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.