सध्या सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्स राखून पराभव केला होता. मात्र पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या लढतीला देशभरातून तीव्र विरोध झाला होता. तसेच मुंबई आणि महाराष्ट्रातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या सामन्याविरोधात तीव्र आंदोलन केलं होतं. आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही या लढतीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे पुत्र जय शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीकेचे आसूड ओढले आहेत.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बऱ्याच दिवसांनंतर राजकीय व्यंगचित्रामधून आपली भूमिका मांडली आहे. तसेच पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या जखमा ताज्या असतानाही पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यासाठी परवानगी देण्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आणि आयसीसीमधील पदाधिकारी असलेले त्यांचे पुत्र जय शाह यांना लक्ष्य केलं आहे.
राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रामध्ये पहगलाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले लोक दिसत असून, जय शाह त्यांना ‘’अरे बाबांनो उठा, आपण जिंकलोय, पाकिस्तान हरलंय’’, असं सांगताना दिसत आहेत. तर गृहमंत्री अमित शाह हे हाताची घडी घालून उभे आहेत. यावरून राज ठाकरे यांनी नक्की कोण जिंकलं आणि नक्की कोण हरलंय? असा सवाल केला आहे. तसेच हे व्यंगचित्र प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.