आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला सामना वादाचं केंद्र ठरला होता. एकीकडे पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास भारतामधूनच तीव्र विरोध होता. दुसरीकडे प्रत्यक्ष सामन्यावेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघातील इतर खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळल्यामुळे वाद आणखीनच चिघळला होता. दरम्यान, आता स्पर्धेतील सुपर ४ फेरीत भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानी संघाच्या जखमेवर मीठ चोळत त्यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.
काल ओमानविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादव याला सुपर ४ फेरीत पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या लढतीविषयी विचारण्यात आले असता त्याने पाकिस्तानचं नाव न घेता मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. तसेच ‘’आम्ही सुपर ४ साठी तयार आहोत’’, असे त्याने सांगितले. त्यामधून आपण प्रतिस्पर्ध्याबाबत फारसा विचार करत नसल्याचे त्याने दाखवून दिले.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान, झालेल्या साखळी सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवने प्रकिस्पर्धी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. एवढंच नाही तर सूर्यकुमार यादव याने विजय मिळवल्यानंतर हा विजय पुलवामा हल्ल्यातील मृतांना समर्पित केला होता. तसेच या मुद्द्यावरून पाकिस्तानी संघाने मोठ्या प्रमाणात आकांततांडव केला होता. तसेच परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आरोप करत पाकिस्तानने सामनाधिकारी अँडी पायक्राफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती.
दरम्यान, काल ओमानविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय संघाने २१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताने ८ गडी गमावून १८८ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल ओमानने भारताला चांगली टक्कर देत २० षटकांत १६७ धावांपर्यंत मजल मारली होती.