axar patel head injury update : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील शेवटचा गट सामना जिंकला. भारताने ओमान विरूद्ध २१ धावांनी शानदार विजय मिळवत विजयी घोडदौड सुरूच ठेवली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ओमानला फक्त १६७ धावाच करता आल्या. आता भारताचे सुपर ४चे सामने उद्यापासून सुरू होणार आहे. आधी पाकिस्तान, मग बांगलादेश आणि शेवटी श्रीलंका असे तीन सामने भारत खेळणार आहे. या सामन्यांआधी भारतीय संघाची चिंता वाढवणारी एक बातमी मिळाली आहे. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलच्या डोक्याला ओमानविरुद्ध सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या संघातील सहभागाबाबत साशंकता आहे.
अक्षर पटेलला गंभीर दुखापत
ओमानविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेल क्षेत्ररक्षण करताना १५ व्या षटकात फलंदाज हमीद मिर्झाने मोठा फटका मारला. अक्षर पटेल मिडऑफमधून झेल घेण्यासाठी धावला. झेल घेण्याचा प्रयत्न करताना त्याचा तोल गेला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला आणि मानेला दुखापत झाली. त्यानंतर त्याला वेदना असह्य झाली आणि त्याने फिजिओथेरपिस्टच्या मदतीने मैदान सोडले. ओमानच्या उर्वरित डावात तो परतला नाही, ज्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
अक्षर पटेलबद्दल ताजी अपडेट काय?
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी अक्षरच्या प्रकृतीबद्दल अपडेट देत सांगितले की तो सध्या ठीक आहे. पण रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात त्याचा सहभाग अद्याप निश्चित नाही. पहिल्या सुपर-४ सामन्याला फक्त ४८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असल्याने तो खेळेल असे वाटत नाही. त्याच्या तंदुरुस्तीसाठी इतका कमी वेळ पुरेसा नाही. अशा परिस्थितीत संघाला रणनिती थोडी बदलावी लागू शकते.
स्टँड-बाय खेळाडूची गरज भासणार?
अक्षर पटेलच्या दुखापतीबाबत बीसीसीआय लवकरच निर्णय घेईल. जर तो स्पर्धेतून बाहेर पडला तर त्याच्या जागी स्टँडबाय खेळाडूची घोषणा केली जाऊ शकते. भारतीय संघात अष्टपैलू रियान पराग आणि वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू स्टँडबाय आहेत. त्यामुळे गरज पडल्यास यापैकी कोणत्याही खेळाडूला मुख्य संघात समाविष्ट केले जाऊ शकते.