Jasprit Bumrah Break Bhuvneshwar Kumar Record : आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहनं अपेक्षेला साजेशी गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजीतील हवाच काढली. पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर आधी हार्दिक पांड्याने पहिल्या षटकात पाकिस्तानला पहिला धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या षटकात पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. त्यानंतर कुलदीप आणि अक्षरची जादू दिसली अन् पाकिस्तानचा संघ कसा बसा १२७ धावांपर्यंत पोहचला. या सामन्यात दोन विकेट्स घेत जसप्रीत बुमराहनंसहकारी भुवनेश्वर कुमार याला मागे टाकत खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या षटकात पहिली विकेट अन्...
पाकिस्तानच्या डावातील दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराह आपलं पहिलं षटक घेऊन आला या षटकात त्याने विकेट किपर बॅटर मोहम्मद हारिस याला खातेही न उघडता तंबूचा रस्ता दाखवला. या बॅटरनेच पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. आपल्या ४ षटकांच्या कोट्यातील अखेरच्या षटकात सूफियान मुकीम याची विकेट घेत जसप्रीत बुमराहनं ४ षटकात २८ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या.
भुवनेश्वर कुमारला टाकले मागे
पाकिस्तान विरुद्ध दोन विकेट्सचा डाव साधताच जसप्रीत बुमराहनं टीम इंडियातील स्विंगचा जादूगार भुवनेश्वर कुमारला मागे टाकले. आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजीत बुमराह चौथ्या स्थानावर पोहचला आहे. भुवीनं आपल्या टी-२० कारकिर्दीत ९० विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहच्या खात्यात आता ९२ विकेट्स जमा झाल्या आहेत.
भारतीय संघाकडून T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
गोलंदाज | बळी |
---|---|
अर्शदीप सिंग | ९९ |
युजवेंद्र चहल | ९६ |
हार्दिक पांड्या | ९५ |
जसप्रीत बुमराह | ९२ |
भुवनेश्वर कुमार | ९० |