IND vs PAK Hardik Pandya Second Indian Bowler To Take Wicket First Ball In T20I : दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावल्यावर भारतीय संघावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याची वेळ आली. सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरलेल्या कॅप्टन सूर्यकुमार यादवनं पहिल्या षटकासाठी चेंडू हार्दिक पांड्याकडे सोपवला. पांड्याने पहिला चेंडू वाइड टाकला. पण त्यानंतरच्या चेंडूवर त्याने पाकिस्तानचा युवा स्टार सैम अयूब याला झेलबाद करत तंबूचा रस्ता दाखवला. जसप्रीत बुमराहनं कोणतीही चूक न करता झेल टिपला अन् पाकिस्तानला मोठा धक्का बसला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अर्शदीप सिंग याच्यानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय ठरला पांड्या
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर सलामीवीर सैम अयूबची विकेट घेत हार्दिक पांड्याने मोठा डाव साधला आहे. हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरलाय. याआधी अर्शदीप सिंगनं अशी कामगिरी केली होती. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अर्शदीप सिंगनं यूएसए विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर शायन जाहांगीरला आउट केले होते.
सैम अयूबवर सलग दुसऱ्यांदा ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
सैम अयूब हा पाकिस्तानी क्रिकेट संघातील उद्योत्मुख खेळाडू आहे. संघाला दमदार सुरुवात करून देण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पण आशिया कप स्पर्धेत तो ससंघर्ष करताना दिसतोय. याआधी ओमान विरुद्धच्या सामन्यातही तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. आता हार्दिक पांड्यासमोर तो पहिल्या चेंडूवर झेलबाद झाला.