आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर ४ फेरीत रविवारी झालेल्या लढतीत भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने पाकिस्तानने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा सहजपणे फडशा पाडला. दरम्यान, स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती प्रमाणेच या लढतीतही भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. एवढंच नाही तर सामन्यानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने असं काही केलं की ज्यामुळे पाकिस्तानी संघाच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग केल्यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या हे भारतीय फलंदाज थेट ड्रेसिंग रूममध्ये परतले. त्यांनी पातिस्तानच्या कुठल्याही खेळाडूशी हस्तांदोलन केलं नाही. त्यानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर फ्रेममध्ये आला. गंभीरने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि इतर भारतीय खेळाडूंना पंचांशी हस्तांदोलन करण्याची सूचना दिली. आता गौतम गंभीरचा या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात गौतम गंभीर ‘’किमान पंचांशी तरी हस्तांदोलन करून घ्या’’, असे सांगताना दिसत आहे.
गौतम गंभीरने दिलेल्या सूचनेनंतर भारतीय खेळाडून मैदानात परतले आणि त्यांनी पंचांसोबत हस्तांदोलन केले आणि माघारी आले. मात्र हे दृश्य पाहून पाकिस्तानी खेळाडू अवाक् झाले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा हा पाकिस्तानविरुद्धचा सलग सातवा विजय आहे. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना भारताने सर्व आठ सामने जिंकले आहेत.
भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर गौतम गंभीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि इतर खेळाडूंचे फोटो ठेवून त्यांचं कौतुक केलं आहे. तसेच या स्टोरीला फियरलेस अर्थात निर्भिड असं शीर्षक दिलं आहे.