Arshdeep Singh Team India Playing XI IND vs BAN Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये आज भारतीय संघाचा सामना बांगलादेशशी होणार आहे. दोन्ही संघांनी सुपर-४ फेरीतील आपापले पहिले सामने जिंकले आहेत. आज हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सुपर-४च्या सामन्यात भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान तिन्ही संघांनी १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. याचदरम्यान, सध्या भारतीय संघात एक बदल केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्शदीप सिंग संघात येणार?
भारतीय संघाने आशिया कप सुरु झाल्यापासून ४ पैकी ४ सामने जिंकले आहेत. कुठल्याही सामन्यात भारतीय संघ वाईट स्थितीत दिसला नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. गेल्या सामन्यात फिल्डिंगमध्ये थोडीशी ढिसाळ कामगिरी दिसली. पण त्यात भारतीय संघ नक्कीच सुधारणा करेल अशी साऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र गोलंदाजी विभागात कदाचित अर्शदीप सिंगला संघात समाविष्ट करून घेतले जाण्याची शक्यता आहे.
अर्शदीप कुणाची जागा घेणार?
टीम इंडिया सध्या तीन फिरकीपटूसह मैदानात उतरताना दिसतेय. संघात वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे दोघे आहेत. तसेच, मध्यमगती गोलंदाज म्हणून शिवम दुबे संघात खेळताना दिसतोय. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने ४ षटकात ४५ धावा दिल्या. गेल्या काही सामन्यात त्याच्या गोलंदाजीची नेहमीसारखी धार दिसत नाही. अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात बुमराहला विश्रांती देऊन अर्शदीपला संघात स्थान दिले जाऊ शकते. भारताचा सुपर-४चा शेवटचा सामना श्रीलंकेशी आहे. त्यामुळे भारत आज एक प्रयोग करून पाहू शकतो.
भारताचा संभाव्य संघ: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.