भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कप २०२५ मध्ये भारतासोबत झालेल्या सामन्यादरम्यान गैरवर्तन केल्याबद्दल पाकिस्तानी खेळाडू हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे अधिकृत तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाने क्रिकेट जगतात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणात आयसीसी काय निर्णय घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
२१ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सुपर ४ सामन्यादरम्यान, काही पाकिस्तानी खेळाडूंनी मैदानावर गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफने भारतीय चाहत्यांनी "कोहली, कोहली!" अशी घोषणाबाजी केल्यानंतर, विमान पाडल्याचा इशारा करून आक्षेपार्ह हावभाव केले. हे कृत्य जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी पाहिले आणि सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाली.
याआधी साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बंदुकीचा इशारा करून जल्लोष केला. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत, त्याने आपल्या कृतीबद्दल बोलताना, "लोक ते कसे घेतील हे मला माहित नाही, पण मला काही फरक पडत नाही," असे उद्धट विधान केले. या दोन्ही घटनांनंतर, बीसीसीआयने तात्काळ आयसीसीकडे तक्रार दाखल केली असून, या खेळाडूंवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
बीसीसीआयच्या तक्रारीनंतर, आयसीसीने या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या वर्तनाबद्दल स्पष्टीकरण मागितले. जर हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांनी लेखी आरोप नाकारले, तर त्यांना आयसीसीच्या एलिट पॅनेल रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर राहावे लागेल. दोघेही त्यांच्या वर्तनाबद्दल स्पष्टीकरण देऊ शकले नाही तर, त्यांच्यावर बंदीची कारवाई होऊ शकते.