Join us

ट्वेंटी-२० पाठोपाठ वन डेचे कर्णधारपद गेले; आता कसोटीतही विराट कोहलीला धक्का देणारी बातमी समोर आली

ट्वेंटी-२० व वन डे त टीम इंडियाच्या नेतृत्वावरून हात गमवावे लागलेल्या विराट कोहलीसाठी ही टेंशन वाढवणारी गोष्ट आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 13:48 IST

Open in App

Ashes Test : अॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं ९ विकेट्स राखून इंग्लंडला मात देताना  मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियानं ४२५ धावा कुटल्या. त्यानंतर इंग्लंडला दुसऱ्या डावात २९७ धावाच करता आल्या आणि त्यांनी ठेवलेले २० धावांचे लक्ष्य ऑसींनी १ विकेटच्या मोबदल्यात पार केले. या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ट्वेंटी-२० व वन डे त टीम इंडियाच्या नेतृत्वावरून हात गमवावे लागलेल्या विराट कोहलीसाठी ही टेंशन वाढवणारी गोष्ट आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांवर गडगडला. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात पॅट कमिन्सनं पाच विकेट्स घेताना १२२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली. मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियानं डेव्हिड वॉर्नर ( ९४), ट्रॅव्हिस हेड ( १५२) व मार्नस लाबुशेन ( ७४) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ४२५ धावा केल्या. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात डेविड मलान ( ८२) व कर्णधार जो रूट ( ८९) यांनी संघर्ष केला अन् कशाबशा २९७ धावा केल्या. नॅथन लियॉननं ४ विकेट्स घेतल्या. ११ महिन्यानंतर त्याला ३९९ वरून ४०० विकेट्सचा पल्ला गाठता आला. ऑसींनी २० धावांचे लक्ष्य सहज पार केलं.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच विजय ठरला आणि त्यांनी WTC PointTable मध्ये थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. पण, या भरारीमुळे टीम इंडियाची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. भारतीय संघ ५८.३३ टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आला आहे.  श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांची टक्केवारी १०० इतकी आहे, परंतु श्रीलंकेच्या खात्यात २४ गुण असल्यानं ते अव्वल स्थानी, तर ऑसी १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. पाकिस्तान ७५ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाविराट कोहलीअ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंड
Open in App