Ashes, AUS vs ENG, Pink Ball Test : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातला अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामन्याचा दुसरा दिवस चुरशीचा होताना दिसतोय. डेव्हिड वॉर्नरचे ( ९५) शतक पहिल्या दिवशी हुकल्यानंतर मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ या जोडीनं इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. पण, स्मिथचेही शतक थोडक्यात हुकले. लाबुशेनला मात्र नशीबाची साथ मिळाली. आजच्या दिवसात इंग्लंडच्या खेळाडूंनी त्याचे तीन झेल सोडले, शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो बाद होऊन माघारी जात होता, परंतु तिसऱ्या अम्पायरनं त्याला थांबवलं अन् रिप्लेत नो बॉल असल्याचे समोर आले. त्यानंतर लगेच त्यानं शतक पूर्ण केले, परंतु शतकानंतर विचित्र पद्धतीनं तो बाद झाला.
मार्नस लाबुशेन हा कसोटी क्रिकेटचा परफेक्ट मटेरियल आहे. त्याच्या खेळण्याचा अंदाज सर्वांना आवडतोय, त्यात अॅशेसमध्ये त्याची खेळपट्टीवर स्टाईल सर्वांचे लक्ष वेधतेय. धाव घेऊ नकोस, असे मोठमोठ्यानं ओरडणे, स्वतःशीच काहीतरी पुटपुटणे, हे  चाहत्यांना भावतेय. त्यामुळेच त्याच्या खेळीकडे सारे टक लावून पाहत आहेत.  जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या  लाबुशेननं ३०५ चेंडूंत १०३ धावा करून ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. पण, हे शतक पूर्ण होण्यासाठी नशीबानंही त्याला चांगली साथ दिली. त्याचे तीन झेल सुटले आणि एक झेल पकडला गेला तो नो बॉल ठरला.
लाबुशेननं कसोटीतील ६ वेश तक पूर्ण केले आणि अॅशेस मालिकेतील पहिलेच शतक ठरले.  शतकासाठी पाच धावांनी आवश्यकता असताना ऑली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर तो यष्टींमागे झेलबाद झाला. इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोष करण्यास सुरुवात केली, पण पेव्हेलियनच्या दिशेनं जाणाऱ्या लाबुशेनला तिसऱ्या पंचांनी थांबण्यास सांगितले. तिसऱ्या पंचांना नो बॉल चेक केला आणि रिप्लेत रॉबिन्सनचं पाऊल लाईनीच्या पुढे पडल्याचे दिसताच तिसऱ्या पंचांनी निर्णय बदलला. आता ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात जल्लोष झाला.  
पहिल्या दिवशी रॉबिन्सनकडूनच लाबुशेनचा झेल सुटला होता. त्यानंतर यष्टिरक्षक जोस बटलरनं दोनवेळा झेल सोडला.  
पण, सरतेशेवटी रॉबिन्सनेच त्याची विकेट घेतली. त्याला पायचीत पकडले. लाबुशेननं DRSघेतला, परंतु यावेळी नशिब त्याच्या बाजूनं नव्हतं.  
ऑस्ट्रेलियानं पहिला डाव ९ बाद ४७३ धावांवर घोषित केला आहे. अॅलेक्स करी ( ५१),  मिचेल स्टार्क ( ३९*) आणि मिचेल नेसर ( ३५) यांनी तळाच्या फलंदाजीत योगदान दिले. बेन स्टोक्सनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.