Team India, IND vs PAK T20 World Cup 2026: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी२० विश्वचषकाच्या सामन्याबाबत अद्यापही साशंकता आहे. सर्वात आधी बांगलादेशचे कारण पुढे करत पाकिस्तानने भारताशी खेळण्यास नकार दिला. त्यानंतर आयसीसीने मध्यस्थी करत यावर तोडगा काढण्याचा आणि निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. यानंतर आता पाकिस्तानचा संघ भारताशी खेळण्याी शक्यता असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या भारत-पाक सामन्याच्या वादादरम्यान, भारतीय संघाचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
भारताने टी२० विश्वचषक २०२६ची सुरुवात अमेरिकेविरूद्धच्या विजयाने केली. टी२० विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना नामिबियाविरुद्ध होणार आहे. हा सामना १२ फेब्रुवारीला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी सोमवारी होणारे पर्यायी सराव सत्र रद्द केले आहे. भारताने स्पर्धेतील पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळला. त्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी सुमार होती. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी सराव करणे अपेक्षित होते. पण टीम इंडियाने हे सराव सत्र रद्द केले.
सराव सत्र रद्द का?
भारतीय संघाचे पर्यायी सराव सत्र रद्द करण्यामागील अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. पण असे मानले जाते की, नामिबिया आणि नेदरलँड्स संघांना सराव मैदान उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेतला गेला असावा. हे दोन्ही संघ १० फेब्रुवारी रोजी दिल्लीत एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत आणि त्यापूर्वी, दोन्ही संघ ९ फेब्रुवारी रोजी सराव सत्र आयोजित करतील. नामिबिया संघ सकाळी सराव करेल, तर नेदरलँड्स संध्याकाळी सराव करेल.
पत्रकार परिषद होणार नाही - बीसीसीआय
बीसीसीआयने आपल्या अधिकृत निवेदनात टीम इंडियाच्या पर्यायी सराव सत्र रद्द करण्याला एक दिवसाची सुट्टी म्हणून वर्णन केले आहे. ही सुट्टी का आहे याचे कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांच्या निवेदनात असेही म्हटले आहे की टीम इंडिया हा दिवस सुट्टी घेईल आणि त्यामुळे पत्रकार परिषदही होणार नाही.