कराची : न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून शोएब अख्तर यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना मृतांना श्रंद्धांजली वाहिली. या गोळीबारात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. हल्लेखोरांनी काळे कपडे परिधान केले होते. न्यूझीलंड पोलिसांनी 4 जणांना ताब्यात असून, त्यात 1 महिला तर 3 पुरुषांचा समावेश आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना अब अल्लाह के घर मे हम सुरक्षित नही? असा सवाल केला.
गोळीबार सुरू असताना मशिदीत बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडूही होते, सुदैवानं त्यना काही झाले नाही. बांगलादेशची टीम सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेशातील क्रिकेट टीमचा खेळाडू तमीम इक्बालनं ट्विट करत याची माहिती दिली आहे. हल्ल्यातून वाचल्यानंतर मुश्तफिकूर रहीम यानेही ट्विट करत अल्लाहचे आभार मानले आहेत. सेंट्रल ख्राइस्टचर्चच्या प्रशासनानं लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, मशिदींमध्ये ज्यावेळी गोळीबार झाला, तेव्हा तिथे अनेक जण उपस्थित होते.
या घटनेवर अख्तरनं ट्विट केलं की,''ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटे उभे राहिले. अल्लाहच्या घरताही आपण सुरक्षित नाही? या दहशतवादी कृत्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बांगलादेशचे क्रिकेटपटू सुखरुप असल्याचा आनंद आहे, परंतु त्याच वेळी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन.''
दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं हल्ल्यातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशविरुद्ध होणारा सामना पुढे ढकलण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. गोळीबारीचा आवाज येताच बांगलादेशचे खेळाडू संघाच्या बसमध्येच बसून राहिले. थोड्या वेळानंतर खेळाडू बसमधून उतरून नजीकच्या मैदानाच्या दिशेने धावले. त्यानंतर ते हॉटेलमध्ये परतले. दोन्ही संघांच्या सुरक्षेची खातरजमा केल्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.