Andre Russell Retirement: गोलंदाजांना धडकी भरवणारा वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू आंद्रे रसेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आंद्रे रसेलने २०१० मध्ये कारकिर्दीला सुरूवात केली. पण २०१९ पासून तो फक्त टी२० आंतरराष्ट्रीय सामनेच खेळत होता. त्याने आतापर्यंत वेस्ट इंडिजच्या संघाकडून ८४ सामने केले आणि १६३च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. रसेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीही तो IPL आणि इतर टी२० लीग स्पर्धा खेळत राहणार आहे.
शेवटचा सामना कधी?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. हा सामना त्याच्या घरच्या मैदानावर खेळला जाईल. रविवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी जाहीर झालेल्या वेस्ट इंडिजच्या टी२० संघात ३७ वर्षीय रसेलचा समावेश करण्यात आला आहे. मालिकेतील पहिले दोन टी२० सामने २० जुलै आणि २२ जुलै रोजी जमैकामधील सबिना पार्क येथे होणार आहेत. हे रसेलच्या कारकिर्दीतील निरोपाचे सामने असतील.
टी२० आंतरराष्ट्रीय स्वरूपातून निवृत्तीची घोषणा करताना आंद्रे रसेल म्हणाला, "मला मिळालेल्या संधीचे शब्दांत वर्णन करता येत नाही. वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद कामगिरींपैकी एक आहे. लहान असताना मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचेन अशी मला अपेक्षा नव्हती, परंतु तुम्ही जितके जास्त खेळायला सुरुवात करता आणि खेळावर प्रेम करता तितकेच तुम्हाला कळते की तुम्ही काय साध्य करू शकता. यामुळे मला चांगले बनण्याची प्रेरणा मिळाली. कारण मला वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये माझी छाप सोडायची होती आणि इतरांसाठी प्रेरणा बनायचे होते."
"मला वेस्ट इंडिजसाठी खेळायला आवडते आणि मला माझ्या कुटुंबासमोर आणि मित्रांसमोर घरी खेळायला आवडते जिथे मला माझी प्रतिभा दाखवण्याची आणि अधिक उच्च दर्जाची कामगिरी करण्याची संधी मिळते. कॅरिबियनमधून येणाऱ्या क्रिकेटपटूंच्या पुढच्या पिढीसाठी एक आदर्श बनून मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट उच्च पातळीवर करू इच्छितो."