Join us

२४ वर्षीय अमेलिया ठरली महिलांमध्ये सर्वोत्तम क्रिकेटर! न्यूझीलंडला पहिल्यांदाच मिळाला बहुमान

Amelia Kerr, ICC women cricketer of the year : महिलांमध्ये अमेलिया केर तर पुरुषांमध्ये जसप्रीत बुमराह ठरला सर्वोत्तम क्रिकेटपटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 08:47 IST

Open in App

Amelia Kerr, ICC women cricketer of the year : न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिची आयसीसीने मंगळवारी २०२४ची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून निवड केली. प्रतिष्ठेचा राशेल हेहोई फ्लिंट करंडक पटकविणारी ती देशाची पहिली खेळाडू बनली आहे. २४ वर्षांच्या अमेलियाने लॉरा वोलवार्ट, चामरी अटापट्ट आणि अनाबेल सदरलॅन्ड यांसारख्या स्टार खेळाडूंना मागे टाकून हा सन्मान मिळविला. वर्षभरात अमेलियाने अष्टपैलू कामगिरी करीत जगाचे लक्ष वेधून घेतले होते.

बुमराह ठरला वेगवान गोलंदाज म्हणून पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. २०२४ या वर्षात त्याने विक्रमी कामगिरी करताना प्रत्येक प्रारूपात कौशल्य, सातत्य आणि अचूक कामगिरीत उत्कृष्टतेचे उदाहरण दिले. ३१ वर्षांच्या बुमराहला सोमवारी आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले आणि त्याला वर्षातील कसोटी संघातही स्थान देण्यात आले.

आतापर्यंत बहुमान मिळालेले भारतीय

आयसीसीकडून सांगण्यात आले की, आयसीसी पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून जसप्रीत बुमराहची सर गारफील्ड सोबर्स पुरस्कारासाठी निवड झाली. २०२४ मध्ये त्याने कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विरोधी संघांवर दबाव कायम ठेवला. बुमराहच्या आधी भारताकडून राहुल द्रविड (२००४), सचिन तेंडुलकर (२०१०), रविचंद्रन अश्विन (२०१६) आणि विराट कोहली (२०१७, २०१८) यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

आयसीसीकडून सांगण्यात आले की, बुमराहच्या कौशल्याची झलक आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत दिसून येते. जेथे त्याने ९०० गुणांचा टप्पा ओलांडला आणि वर्षाचा शेवट ९०७ गुणांसह केला. जो क्रमवारीच्या इतिहासातील कोणत्याही भारतीय गोलंदाजासाठी सर्वोच्च आहे. २०२४मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताच्या जेतेपदात बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याने १५ बळी घेतले होते. कसोटीत तो सर्वांत जलद २०० बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आणि त्याची सर्वोत्तम सरासरी २० आहे.

बुमराहने गतवर्षी १३ कसोटीत १४.९२च्या सरासरीने ७१ बळी घेतले. कपिल देव यांच्या १९८३मधील १०० बळींनंतर ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. बॉर्डर गावसकर मालिकेत त्याने ३२ बळी घेतले.

टॅग्स :आयसीसीन्यूझीलंडजसप्रित बुमराहभारतसचिन तेंडुलकरविराट कोहली