चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जेतेपदासाठी अंतिम सामना रंगणार आहे. दुबईच्या मैदानात रंगणाऱ्या या सामन्याआधी भारतीय संघाने साखळी फेरीत किवी ताफ्याला रोखून दाखवलं. पण तरीही फायलमध्ये या संघाला कमी लेखून चालणार नाही. यामागचं कारण न्यूझीलंड संघ हा अगदी हुशारीनं रणनिती आखून बाजी पलटणाऱ्या संघांपैकी एक मानला जातो. अंतिम सामन्यात त्यांनी खेळलेला प्रत्येक डाव हाणून पाडण्याचं मोठं चॅलेंज टीम इंडियासमोर असेल. भारताचा माजी क्रिकेट अंबाती रायडूनं स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये दुबईच्या मैदानात रंगणाऱ्या फायनलमध्ये भारतीय संघाला तीन खेळाडूंपासून सावध रहावे लागेल, असे म्हटले आहे. इथं एक नजर टाकुयात टीम इंडियाला टेन्शन देऊ शकतील, अशा न्यूझीलंडच्या ३ मोहऱ्यांवर....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिडल ओव्हर्समध्ये मिचेल सँटनर घेऊ शकतो फिरकी
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर हा सामन्याला कलाटणी देणारी कामगिरी करण्याची क्षमता असणारा फिरकीपटू आहे. दुबईच्या तुलनेत लाहोरच्या मैदानात फिरकीला मदत नसताना त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कमालीची गोलंदाजी केली. दुबईच्या खेळपट्टीवर मिडल ओव्हर्समध्ये त्याचा सामना करणे भारतीय फलंदाजांसाठी सोपी गोष्ट नसेल. सँटनरनं आतापर्यंत ४ सामन्यात फक्त ७ बळी टिपले आहेत. पण धावागतीवर अंकूश ठेवत त्याने प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणले आहे. त्यामुळे त्याचा सामना करणं टीम इंडियासाठी चॅलेंजिग असेल, असे माजी क्रिकेटर अंबाती रायडूला वाटते.
रचिन रविंद्रवरही असतील साऱ्यांच्या नजरा
न्यूझीलंडच्या ताफ्यातील २५ वर्षीय युवा अष्टपैलू खेळाडू हा कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. तीन सामन्यात त्याने दोन शतके झळकावून सामना एकहाती फिरवण्याची ताकद असल्याचे दाखवून दिले आहे. साखळी फेरीतील भारताविरुद्धच्या सामन्यात त्याचा निभाव लागला नव्हता. अगदी त्याचपद्धतीने यावेळीही त्याला लवकरात लवकर बाद करावे लागेल. कारण हा न्यूझीलंडच्या ताफ्यातील मोठा आधार आहे.
पिक्चरमध्ये नसलेल्या या हिरोची होऊ शकते एन्ट्री
न्यूझीलंडचा संघ फायनलमध्ये डेवॉन कॉन्वेवर डाव खेळू शकतो, अशी भविष्यवाणी अंबाती रायडूनं केलीये. चॅम्पियन्स ट्रॉफीस्पर्धेत पाकिस्तान आणि बांगालेदश यांच्याविरुद्धच्या दोन सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पण त्यानंतर त्याला बाकावर बसावे लागले. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो पुन्हा पिक्चरमध्ये येऊ शकतो. डेवॉन कॉन्वे हा फिरकीविरुद्ध उत्तम खेळ करण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. तो भारतीय फिरकीसमोर चॅलेंज उभे करू शकतो. त्यामुळेच या फलंदाजापासूनही टीम इंडियाला सावध रहावे लागेल, असे अंबाती रायडूला वाटते.