क्रिकेट जगतातून एक अत्यंत रंजक आणि मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील प्रतिभावान लेग-स्पिनर अमांडा वेलिंग्टन ही भारताची सून होणार आहे. तिने आपले भावी जीवन सुरू करण्याची तयारी दाखवली असून, भारताकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या इच्छेमागे एक गोड कारण आहे. वेलिंग्टनने अलीकडेच प्रेमाचे प्रतीक असलेल्या आग्रा येथील ताजमहाल येथे आपल्या प्रियकरासोबत साखरपुडा केला. साखरपुड्यानंतर, अमांडा वेलिंग्टनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
"मला भारत देश खूप आवडतो. जर भविष्यात कधी संधी मिळाली, तर मी भारतीय महिला क्रिकेट संघात खेळण्यासाठी तयार आहे.", असे तिने म्हटले आहे. तिचा होणारा नवरा हा भारतीय आहे. सध्या तिने नवऱ्याचे नाव सांगितलेले नसले तरी त्याच्यासोबतचा ताजमहाल परिसरातील फोटो शेअर केला आहे.
खरेच ती खेळू शकते का?
जरी तिने भारताकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार, राष्ट्रीयत्व बदलून दुसऱ्या देशाकडून खेळण्यासाठी खेळाडूंना अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागते. तसेच, तिने ऑस्ट्रेलियाकडून खेळलेल्या शेवटच्या सामन्याला किती काळ झाला आहे, यावरही हे अवलंबून असेल. तिने ऑस्ट्रेलियाला दोन वर्ल्डकप जिंकून दिले आहेत.