Team India Schedule :  भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि त्यासाठी भारतीय संघ द्विपक्षीय मालिका आणि आशिया चषक स्पर्धा अशा एकूण १२ वन डे सामने खेळणार आहे. सध्या भारतीय संघ एका महिन्याच्या विश्रांतीवर आहे आणि पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावरून भारताच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीला सुरूवात होणार आहे. पुढील आठवड्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होईल. ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि टीम इंडियाला प्रबळ दावेदार समजले जातेय, पण त्यासाठी रोहित शर्मा अँड टीम तयार आहे का?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना १५ ऑक्टोबरला होणार आहे. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. पण, या स्पर्धेसाठी भारतीय संघाला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळतोय का?
 दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर भारतीय खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी लंडनमध्ये दाखल झाले अन् तिथे ऑस्ट्रेलियाकडून हरले. त्यानंतर आता भारतीय खेळाडू एका महिन्याच्या विश्रांतीवर आहेत आणि जुलै महिन्यात ते वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहेत. विंडीज दौऱ्यावर भारतीय संघ दोन कसोटी, तीन वन डे आणि पाच ट्वेंटी-२० सामने खेळणार आहेत. १२ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होतेय.  
विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी श्रीलंकेत जाईल. पाकिस्तानकडे यजमानपद असले तरी हायब्रिड मॉडेलनुसार तेथे चार सामने होतील आणि उर्वरित ९ सामने श्रीलंकेत होतील. ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषक खेळवली जाणार आहे. आशिया चषक स्पर्धेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाला १२ वन डे सामने खेळण्यास मिळत आहेत. यावरून भारताला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघही निश्चित करायचा आहे.