Ajinkya Rahane Steps Down As Mumbai Captain : भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आगामी देशांतर्गत स्पर्धेआधी मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यावर रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करत होता. पण ३७ वर्षीय क्रिकेटरनं आता नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतलाय. अजिंक्य रहाणेनं सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत मुंबई संघाचे नेतृत्व सोडले असले तरी या संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल, असे म्हटले आहे.
का सोडली कॅप्टन्सी? अजिंक्य रहाणे नेमकं काय म्हणाला?
अजिंक्य रहाणे याने एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर करत मुंबई संघाचे नेतृत्व सोडल्याची माहिती दिली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय की, “मुंबई संघाचे नेतृत्व करणे आणि जेतेपद मिळवणे हीमाझ्याासठी अभिमानास्पद गोष्ट आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील नव्या हंगामाआधी नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी ही योग्य वेळ आहे. त्यामुळेच मी नेतृत्व सोडत आहे. खेळाडूच्या रुपात संघासोबत राहिन," असा उल्लेखही त्याने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघानं रणजी ट्रॉफीसह ही स्पर्धा जिंकली
रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने २०२३-२४ च्या हंगामात सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. याशिवाय २०२४-२५ च्या हंगामात मुंबई संघाने त्याच्या नेतृत्वाखालीच ईरानी ट्रॉफीवरही नाव कोरले होते. कॅप्टन्सीच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावरही खेळाडूच्या रुपात खेळणार असल्याचे सांगत स्पष्ट करत सध्याच्या घडीला निवृत्तीचा विचार करत नाही, हेही क्रिकेटरनं अगदी स्पष्ट सांगितले आहे.