Ajinkya Rahane Steps Down As Mumbai Captain : भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आगामी देशांतर्गत स्पर्धेआधी मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यावर रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करत होता. पण ३७ वर्षीय क्रिकेटरनं आता नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतलाय. अजिंक्य रहाणेनं सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत मुंबई संघाचे नेतृत्व सोडले असले तरी या संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल, असे म्हटले आहे.
का सोडली कॅप्टन्सी? अजिंक्य रहाणे नेमकं काय म्हणाला?
अजिंक्य रहाणे याने एक्स अकाउंटवरून पोस्ट शेअर करत मुंबई संघाचे नेतृत्व सोडल्याची माहिती दिली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय की, “मुंबई संघाचे नेतृत्व करणे आणि जेतेपद मिळवणे हीमाझ्याासठी अभिमानास्पद गोष्ट आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील नव्या हंगामाआधी नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी ही योग्य वेळ आहे. त्यामुळेच मी नेतृत्व सोडत आहे. खेळाडूच्या रुपात संघासोबत राहिन," असा उल्लेखही त्याने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघानं रणजी ट्रॉफीसह ही स्पर्धा जिंकली
रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने २०२३-२४ च्या हंगामात सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. याशिवाय २०२४-२५ च्या हंगामात मुंबई संघाने त्याच्या नेतृत्वाखालीच ईरानी ट्रॉफीवरही नाव कोरले होते. कॅप्टन्सीच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावरही खेळाडूच्या रुपात खेळणार असल्याचे सांगत स्पष्ट करत सध्याच्या घडीला निवृत्तीचा विचार करत नाही, हेही क्रिकेटरनं अगदी स्पष्ट सांगितले आहे.
कोण होणार मुंबई संघाचा नवा कर्णधार?
मुंबई संघात अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल आणि सरफराज खान हे स्टार मुंबई संघाकडूनच खेळतात. अजिंक्य रहाणेनंतर कॅप्टन्सीच्या शर्यतीत श्रेयस अय्यर हा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. IPL मध्ये कॅप्टन्सीची खास छाप सोडल्यानंतर अय्यर हा भारतीय वनडे संघाची कॅप्टन्सी करू शकतो, अशी चर्चा रंगत आहे. त्याआधी त्याच्या खांद्यावर मुंबईच्या संघाची जबाबादारी येऊ शकते.
Web Title: Ajinkya Rahane Steps Down As Mumbai Captain Know Why He Took This Decision Who Is Next Shreyas Iyer Is Perfect Option
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.