Join us

प्रशिक्षकपदासाठी माजी खेळाडूला विचारले, 'ठेंगा' दाखवताच BCCI पुन्हा द्रविडकडे वळले

राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा करार वाढवून घेण्यास इच्छुक नसल्याचे वृत्तही समोर आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 14:09 IST

Open in App

वन डे वर्ल्ड कप स्पर्धा संपताच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचा कार्यकाळ संपला. राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा करार वाढवून घेण्यास इच्छुक नसल्याचे वृत्तही समोर आले होते. त्यामुळे आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता. बीसीसीआयने या पदासाठी गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आणि भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहरा ( Ashish Nehra) याला विचारणा केली होती. पण, नेहराने स्पष्ट शब्दात नकार दिल्याने त्यांनी राहुल द्रविडच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आणि अखेर त्यांना यश आले.

बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) आणि सपोर्ट स्टाफ यांच्या करारात वाढ केल्याची  घोषणा केली. बीसीसीआयने द्रविडशी चर्चा केली आणि एकमताने कार्यकाळ पुढे नेण्यास सहमती दर्शविली. या कराराचा नेमका कालावधी किती हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसी स्पर्धांमधील दुष्काळ संपवण्यासाठी बीसीसीआयने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी नेहराला विचारले होते. नेहराच्या रणनीती आयपीएलमध्ये यशस्वी ठरल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सने २०२२मध्ये पहिल्याच प्रयत्नात जेतेपद पटकावले, तर २०२३ मध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती. पण, नेहराने बीसीसीआयचा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे त्यांनी पुन्हा द्रविडला विचारणा केली.

रोहित शर्मा व निवड समिती प्रमुख अजित आगरकर या दोघांनीही द्रविडचा कार्यकाळ वाढवण्यात यावा असे मत व्यक्त केले होते. द्रविडसह गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाब्रे व फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड यांचाही कार्यकाळ वाढवला आहे.   

टॅग्स :राहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय