टीम इंडियामध्ये पुनरागमनाची आशा बाळगणाऱ्या भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने रविवारी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. द्रविडनंतर पुजाराला भारतीय कसोटी संघाची भिंत म्हणून ओळखले जाऊ लागले, त्यामागचे कारणही तितकेच खास आहे. पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये अशा अनेक खेळी केल्या आहेत, ज्याची आजही चर्चा आहे. दरम्यान, पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंगबद्दल जाणून घेऊयात.
इंग्लंडविरुद्ध नाबाद २०६ धावा (२०१२)
२०१२ मध्ये अहमदाबाद येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात पुजाराने नाबाद २०६ धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कसोटीतील हे त्याचे पहिलेच द्विशतक होते. या डावात त्याने ३८९ चेंडूंचा सामना केला. या सामन्यात पुजाराने क्रीजवर सुमारे साडेआठ तास घालवले. पुजाराच्या दुहेरी शतकाच्या जोरावर भारताने आठ विकेट्स गमावून ५२१ धावा केल्या. दुसऱ्या डावातही पुजाराने नाबाद ४१ धावा केल्या. भारताने हा सामना ९ विकेट्सने जिंकला.
कसोटीच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम (२०१७)
२०१७ मध्ये, जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर होता, तेव्हा रांची येथे चौथा सामना खेळला गेला. या कसोटीत पुजाराने ५२५ चेंडूंचा सामना केला आणि २०२ धावा केल्या, जो भारतासाठी कसोटीच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम आहे. या डावात त्याने २१ चौकार आणि एक षटकार मारला. पुजाराच्या या खेळीमुळे हा सामना अनिर्णित ठरला.
जोहान्सबर्गच्या कठीण खेळपट्टीवर नाबाद १५३ धावा (२०१८)
दक्षिण आफ्रिकेत धावा काढणे खूप कठीण असते, तेही जेव्हा तुमच्यासमोर कागिसो रबाडा, व्हर्नन फिलँडरसारखे गोलंदाज असतात. २०१८ मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती आणि जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने फक्त ७ धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या आणि येथून पुजाराने कठीण खेळपट्टीवर नाबाद १५३ धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात ३०७ धावा केल्या आणि सामना जिंकला.
पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय
२०१८ मध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती. भारताने ही मालिका जिंकली आणि ७१ वर्षांत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली. यामध्ये पुजाराचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. या दौऱ्यावर पुजाराने अॅडलेड कसोटीत २४६ चेंडूत १२३ धावा केल्या. भारताने सुरुवातीच्या दोन विकेट लवकर गमावल्या. परंतु, पुजारा क्रीजवर टिकून राहिला. त्याच्या खेळीमुळे भारताचा पहिला डाव २५० धावांवर पोहोचला. हा सामना भारताने ३१ धावांनी जिंकला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महत्त्वाची खेळी (२०२१)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेली टीम अडचणीत होती. जर भारताने सिडनीमध्ये खेळलेला कसोटी सामना गमावला असता तर मालिका जिंकणे कठीण झाले असते. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने २०२ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. त्याच्या संयमी फलंदाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना थकवले आणि भारताला ४०७ धावांपर्यंत पोहोचवले. या खेळीने सामना बरोबरीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे मालिकेत भारताच्या आशा जिवंत राहिल्या. यानंतर, पुजाराने ब्रिस्बेन कसोटी सामन्यातही अर्धशतक झळकावले आणि भारताला सामना आणि मालिका महत्त्वाची भूमिका बजावली.