delhi capitals team | नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मधील आपले पहिले ५ सामने दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे होते. शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (DC vs RCB) दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव केला. खरं तर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वातील दिल्लीचा या स्पर्धेत सलग पाचवा पराभव झाला आहे. २०२० मध्ये आयपीएलचा फायनलचा सामना खेळणारा दिल्लीचा संघ सध्या विजयाच्या शोधात आहे. संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर सातत्याने धावा करत असला तरी त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच दिल्लीच्या संघाचे डायरेक्टर सौरव गांगुली यांनी एक मोठे विधान केले आहे.
दिल्लीच्या खेळाडूंचे मनोबल वाढवताना गांगुलींनी म्हटले, "जे काही झाले ते विसरून आपण पुढे पाऊल टाकले पाहिजे. आपण सर्वांनी कर्णधाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ द्यायला हवी. पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करून पुढच्या सामन्यात पुनरागमन करू. आता जे काही होईल ते चांगलेच यासाठी आपल्याला खेळायचे आहे. अद्याप ९ सामने बाकी आहेत आणि नक्कीच आपण नऊ पैकी नऊ जिंकू शकतो. आपण क्वालिफाय होऊ की नाही हे आताच्या घडीला महत्त्वाचे नाही."
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग आणि सौरव गांगुली खेळाडूंना मार्गदर्शन करतानाचा व्हिडीओ फ्रँचायझीने शेअर केला आहे. यामध्ये प्रशिक्षक पॉंटिंगने खेळाडूंचे मनोबल वाढवताना काही सल्ले दिले. दिल्लीचा आगामी सामना २० तारखेला कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध होणार आहे.
दिल्लीचा सलग पाचवा पराभव
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दिल्लीचा पाचवा सामना आरसीबीसोबत झाला. खरं तर या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला सलग पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबीने २३ धावांनी विजय मिळवून दिल्लीला आणखी एक धक्का दिला. आता दिल्लीचा पुढीला सामना २० एप्रिल रोजी कोलकात नाईट रायडर्सविरूद्ध होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"