नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. सोमवारी संघ जाहीर होताच क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. आशिया चषकाला मुकलेला जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले आहे. नुकतीच आशिया चषकाची स्पर्धा पार पडली. स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ अंतिम फेरी देखील गाठू शकला नव्हता. भारताची कमजोर गोलंदाजी पाहता बीसीसीआयने टी-20 विश्वचषकासाठी गोलंदाजीत बदल केला आहे.
भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह या 4 वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, मोहम्मद शमी, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि इतर काही खेळाडूंनी मागील वर्षात चांगली कामगिरी करून देखील त्यांना 15 सदस्यीय संघात स्थान मिळाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भारतीय संघ जाहीर होताच चाहत्यांनी सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडला. काहींनी सॅमसन, अय्यरवरून बीसीसीआयवर निशाणा साधला तर काहीजण त्यांची खिल्ली उडवत आहेत.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग.
स्टॅंड बॉय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील वेळापत्रक
23 ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
27 ऑक्टोबर - भारत वि. A गटातील उपविजेता, 12.30 वाजल्यापासून, सिडनी
30 ऑक्टोबर - भारत वि. दक्षिण आफ्रिका, 4.30 वाजल्यापासून, पर्थ
2 नोव्हेंबर - भारत. वि. बांगलादेश, 1.30 वाजल्यापासून, एडलेड
6 नोव्हेंबर - भारत वि. B गटातील विजेता, 1.30 वाजल्यापासून, मेलबर्न
13 नोव्हेंबरला अंतिम सामना