लंडन : महिला क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीनं इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाची ही खेळाडू जवळपास चार वर्षांनंतर बाद झाली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिलांच्या अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पेरी बाद झाली. इंग्लंडच्या लौरा मार्शने तिला 116 धावांवर तंबूत पाठवले.
एलिसे 2015मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये अखेरची बाद झाली होती. त्यानंतर आज म्हणजेच 3 वर्ष 11 महिने आणि 6 दिवसांनंतर तिला बाद करण्यात प्रतिस्पर्धींना यश आले. तिने या कालावधीत 655 चेंडूंचा सामना करताना 329 धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्याच यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या सामन्यात तिनं नाबाद 213 धावांची खेळी केली होती. सलग दोन कसोटीत शतक झळकावणारी ती पहिलीच महिला फलंदाज आहे.
![]()
पेरी चार वर्षांत तिसराच कसोटी सामना खेळत आहे. तिनं 2015मध्ये 11 ऑगस्टला इंग्लंडविरुद्ध 13 धावा केल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये तिनं इंग्लंडविरुद्ध नाबाद 213 धावा केल्या आणि आज तिने पुन्हा शतकी खेळी केली.
पेरी आणि राचेल हायनेस ( 87) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 5 बाद 341 धावांपर्यंत मजल मारली आहे.