Hazratullah Zazai Daughter Passes Away: गेले दोन दिवस केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये हा रंगांचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. पण याच दरम्यान क्रिकेटविश्वासाठी मात्र होळीच्या दिवशी एक वाईट बातमी आली. अफगाणिस्तानचा सलामीवीर हजरतुल्लाह झझाई याच्या घरी गुरुवारी त्याच्या अवघ्या दोन वर्षांच्या मुलीचे निधन झाले. संघाचा स्टार सलामीवीर करीम जनत याने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. जन्नतने ही दुःखद बातमी शेअर केली आणि झझाई व त्याच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. अफगाणिस्तान क्रिकेट समुदायाने झझाईच्या कुटुंबीयांना शोकसंदेश पाठवले आणि या कठीण काळात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला या दु:खातून सावरण्यासाठी धीर मिळाला अशी प्रार्थना केली.
“माझ्या भावासारखा असणारा जवळचा मित्र हजरतुल्लाह झझाईने त्याची मुलगी गमावली आहे हे कळवताना मला खूप दुःख होत आहे,” अशी पोस्ट करीम जनत याने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर शेअर केली. या कठीण काळात त्याच्या कुटुंबाला हे दु:ख पचवण्याचे बळ मिळू दे, असेही त्याने लिहिले.
झझाईला अफगाणिस्तान संघाकडून शेवटची संधी तीन महिन्यांपूर्वी मिळाली होती. झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-२० मालिकेत तो खेळताना दिसला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघात झझाईचा समावेश नव्हता. त्याने २०१६ मध्ये युएई विरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने १६ एकदिवसीय आणि ४५ टी-२० सामने खेळले आहेत. टी२० क्रिकेटमध्ये त्याने १,१६० धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. टी२० क्रिकेटमध्ये ६२ चेंडूत ११ चौकार आणि ११ षटकारांसह १६२ धावा करण्याचा धडाकेबाज विक्रम झझाईच्या नावावर आहेत. त्याने आयर्लंडविरूद्ध ही खेळी केली होती.