Join us

ENG vs AFG : अफगाणिस्तानच्या १८ नंबर जर्सीवाल्या हिरोची हवा; इंग्लंडला ३२६ धावांचं टार्गेट दिलं ना भावा

अफगाणिस्तानच्या संघाने ३२५ धावा करत इंग्लंडसमोर सेट केले ३२६ धावांचे टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:34 IST

Open in App

लाहोरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या ताफ्यातून १८ नंबर जर्सी घालून मैदानात उतरलेल्या इब्राहिम झाद्रान (Ibrahim Zadran) याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्याच्या शतकी खेळीशिवाय कॅप्टन हश्मतुल्लाह शहिदी आणि नबीच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघानं 'करो वा मरो' लढती निर्धारित ५० षटकात ७ बाद ३२५ धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये स्फोटक फलंदाज आहेत, पण अफगाणिस्तानच्या सर्वोत्तम गोलंदाजीसमोर इंग्लंडसाठी ३२६ धावांचे टार्गेट आव्हानात्मक ठरू शकते.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इब्राहिम झाद्रान यानं कॅप्टनसोबत केली शतकी भागीदारी

अफगाणिस्तानचा कर्णधार हश्मतुल्लाह शहिदी याने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. गुरबाझ ६ (१५), सेदीकुल्ला अटल ४ (४) आणि रहमत शाह ४ (९) यांच्या रुपात संघाला धक्क्यावर धक्के बसले. एका बाजूला विकेट पडत असताना सलामीवीर इब्राहिम झाद्रान तग धरून मैदानात उभा राहिला. त्याला कॅप्टन शाहिदीची साथ मिळाली आहे. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी रचत अफगाणिस्तानच्या संघाचा डाव सावरला. हश्मतुल्लाह शहिदी ६७ चेंडूत ४० धावांची खेळी करुन माघारी फिरला. 

मग त्याला ओमरझाई अन् मोहम्मद नबीची मिळाली साथ

इब्हारिम झाद्रान याने अझमतुल्लाह ओमरझाईसोबत पाचव्या विकेटसाठी ९२ धावांची दमदार भागीदारी केली. यात ओमरझाईनं ३१ चेंडूत झटपट ४१ धावा ठोकल्या. तो माघारी फिरल्यावर अनुभवी मोहम्मद नबीनं त्याला साथ दिली. सहाव्या विकेटसाठी या दोघांनी शतकी भागीदारी केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अखेरच्या षटकात ५५ चेंडूत दोघांनी १११ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानने इंग्लंड विरुद्धची लढाई ३०० पार धावांची केलीये. इब्राहिम झाद्रान अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. त्याने १४६ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने १७७ धावा ठोकल्या. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ही कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. मोहम्मद नबीनं २४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत ४० धावांचे योगदान दिले.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५अफगाणिस्तानइंग्लंडआयसीसी