ACC U19 Women's Asia Cup 2024: भारतीय संघानं ACC U19 वुमन्स आशिया कप २०२४ च्या स्पर्धेत दमदार कामगिरी करून दाखवत फायनल गाठली आहे. १९ वर्षांखालील भारतीय महिला संघानं सुपर-४ च्या लढतीत श्रीलंकेला पराभूत केले. भारतीय संघाच्या दिमाखदार विजयात आयुषी शुक्ला हिने मोलाची कामगिरी बजावली.
आयुषीचा 'चौकार'
आयुषी हिने ४ षटकात फक्त १० धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. दमदार कामगिरी करणाऱ्या आयुषी शुक्ला हिला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारानेही गौरवण्यात आले. या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना श्रीलंकेच्या संघानं निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त ९८ धावा केल्या होत्या. श्रीलंका संघाची कर्णधार मनुडी नानायक्कारा हिने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. तिच्याशिवाय अन्य खेळाडूंना फारशी चांगली कामगिरी करतान आली नाही.
भारतीय संघानं सहज पार केलं टार्गेट
श्रीलंकेनं दिलेल्या या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघानं १४.५ षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात ९९ धावा केल्या. ४ विकेट्स राखून दमदार विजय नोंदवत टीम इंडियानेफायनल गाठली. भारतीय संघाकडून गोंगाडी त्रिशा हिने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली.
भारत-बांगलादेश यांच्यात फायनल
सुपर ४ मधील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशच्या संघानं नेपाळला ९ विकेट्स आणि ७ चेंडू राखून पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्यामुळे आता रविवारी २२ डिसेंबरला भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात फायनल लढत पाहायला मिळणार आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथील मैदानात रंगणारी फायनल लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजता सुरु होईल. आशिया कप पुरुष गटात असाच सीन पाहायला मिळाला होता. या सामन्यात बांगलादेशच्या संघानं भारतीय संघाला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. यावेळी भारतीय महिला संघ पुरुष गटातील पराभवाची परतफेड करत जेतेपदावर नाव कोरणार का ते पाहण्याजोगे असेल.
दुसऱ्या सामन्यात काय घडलं?
U19 Women's T20 Asia Cup स्पर्धेतील ११ वा सामना हा प्रत्येक ११-११ षटकांचा खेळवण्यात आला. पहिल्यांदा बॅटिंग करताना नेपाळच्या संघाने ११ षटकात ८ बाद ५४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघानं ७ चेंडू आणि ९ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.