Join us

"आता फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी जिंका...", चाहत्याचा प्रश्न ऐकताच रोहित आणि अय्यरनं काय केलं?

पाकिस्तानच्या धरतीवर चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:56 IST

Open in App

shreyas iyer and rohit sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. मालिकेतील पहिला सामना अनिर्णित झाल्यानंतर पुढचे दोन्ही सामने जिंकून यजमानांनी २-० ने मालिका खिशात घातली. आता टीम इंडिया मायदेशात परतली आहे. अशातच कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल एक चाहता रोहित-अय्यरला प्रश्न विचारताना दिसतो. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा होणार आहे. 

रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, संबंधित चाहता त्यांना सांगतो की, आता केवळ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची आहे, चॅम्पियन्स ट्रॉफी... चाहत्याचा प्रश्न ऐकताच अय्यरने स्मितहास्य केले. तर चाहत्याचा प्रश्न ऐकून रोहितलाही हसू अनावर झाले. 

श्रीलंकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत रोहित शर्मा वगळता एकाही भारतीय खेळाडूला साजेशी खेळी करता आली नाही. तिन्ही सामन्यांमध्ये टीम इंडिया लक्ष्याचा पाठलाग करत होती. पण, एकाही सामन्यात त्यांना विजय साकारता आला नाही. सलामीचा सामना भारताने जिंकलाच होता पण अखेरीस अर्शदीपच्या एका चुकीमुळे श्रीलंकेने तोंडचा घास पळवला आणि सामना अनिर्णित संपवला. 

दरम्यान, पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष होत असल्याचे दिसते. आयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानच्या धरतीवर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा थरार रंगणार आहे. पण, बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे कळते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आयसीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. खरे तर भारताने सुरक्षेच्या कारणास्तव नेहमीच पाकिस्तानात जाणे टाळले आहे. शेवटच्या वेळी या दोन्ही देशांमध्ये २०१२-१३ मध्ये द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हापासून केवळ आशिया चषक आणि आयसीसी स्पर्धांमध्ये हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडतात. पाकिस्तानने २०१७ मध्ये भारताचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला होता.

टॅग्स :रोहित शर्माश्रेयस अय्यरऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघ