नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना बॉलिंग मशीनमधून आलेला चेंडू डोक्याला लागून एका युवा क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे घडली आहे. बेन ऑस्टिन असं या क्रिकेटपटूचं नाव असून, १७ वर्षीय ऑस्टिन मेलबर्न येथे सराव करत असताना मशीन मधून आलेला चेंडू लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर उपचारांदरम्यान, त्याचा मृत्यू झाला. बेन याच्या मृत्युमुळे क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे.
बेन ऑस्टिन हा मंगळवारी दुपारी फर्नट्री गल्लीतील वॉली ट्यू रिझर्व्ह येथे सराव करत होता. तेव्हाच ही दुर्घटना घडली. नेट्समध्ये ऑटोमॅटिक बॉलिंग मशीनमधून गोलंदाजीचा सराव करत असताना बेन याने हेल्मेट घातले होते. तरीही डोकं आणि गळ्याच्या भागात येऊन चेंडू लागल्याने त्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर वैद्यकीय पथक तातडीने तिथे दाखल झालं. तसेच बेन याला गंभीर अवस्थेत मोनाश मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मात्र बुधवारी त्याचा मृत्यू झाला.
बेनचे वडील जेस ऑस्टिन यांनी सांगितले की, ‘’आम्ही आमच्या लाडक्या बेनच्या मृत्युमुळे पूर्णपणे खचलो आहोत. हा अपघात आमच्या बेनला आमच्यापासून हिरावून घेऊन गेला’’. दरम्यान, बेन ऑस्टिन ज्या फर्नट्री क्रिकेट क्लबकडून खेळायचा त्या क्लबने एक पत्रक प्रसिद्ध करून बेनच्या मृत्यूची माहिती दिली आहे. तसेच त्याच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.