Join us

आयसीसीच्या 19 वर्षांखालील संघातही यंग इंडियाचा दबदबा! पृथ्वी शॉसह पाच जणांचा समावेश

ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून 19 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय युवा क्रिकेटपटूंनी अजून एक पराक्रम केला आहे. विश्वचषक स्पर्धा आटोपल्यानंतर रविवारी आयसीसीने जाहीर केलेल्या आपल्या संघामध्ये भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ याच्यासह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 14:19 IST

Open in App

दुबई - ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून 19 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय युवा क्रिकेटपटूंनी अजून एक पराक्रम केला आहे.  विश्वचषक स्पर्धा आटोपल्यानंतर रविवारी आयसीसीने जाहीर केलेल्या आपल्या संघामध्ये भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ याच्यासह भारताच्या पाच युवा क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.  आयसीसीने निवडलेल्या आपल्या 19 वर्षांखालील संघामध्ये पृथ्वी शॉ, मनज्योत कालरा, शुभमन गील, अनुकुल रॉय आणि कमलेश नागरकोटी यांना स्थान दिले आहे. मात्र या संघाचे नेतृत्व करण्याचा मान दक्षिण आफ्रिकेच्या रेनार्ड व्हॅन टोंडर याला देण्यात आला आहे. 

 डावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या नाबाद 101 धावांच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला. फायनलमध्ये रुबाबात दाखल झालेल्या भारताने शेवटच्या सामन्यातही तोच रुबाब कायम राखत ऑस्ट्रेलियाचे 217 धावांचे लक्ष्य आरामात पार केले. कालराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अजिबात दाद न देता चौफेर फटकेबाजी केली. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर हार्विक देसाई आणि मनजोत कालराने आणखी पडझड होऊ न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. देसाईने नाबाद 47 धावा केल्या. भारताचा कर्णधार सलामीवीर पृथ्वी शॉ ला सदरलँडने (29) धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध विजयाचा शिल्पकार ठरलेला शुभमन गिल फक्त (31) धावांवर बाद झाला. त्याला फिरकी गोलंदाज उप्पलने बाद केले.  नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या युवा गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 216 धावांवर रोखले. आयसीसीने निवडलेला संघ पुढीलप्रमाणे पृथ्वी शॉ (भारत), मनज्योत कालरा (भारत),  शुभमन गील (भारत),  फिन अॅलन (न्यझीलंड),  रायन व्हॅन टोंडर (द. आफ्रिका, कर्णधार), विंडले माकवुटू ( यष्टीरक्षक, दक्षिण आफ्रिका),  अनुकुल रॉय (भारत). कमलेश नागरकोटी (भारत), गेराल्ड कोएत्झे (दक्षिण आफ्रिका), क्वैश अहमद ( अफगाणिस्तान), शाहेन आफ्रिदी ( पाकिस्तान),12 वा खेळाडू - अलिक अथनाझ ( वेस्ट इंडिज)  

टॅग्स :19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलपृथ्वी शॉभारतीय क्रिकेट संघ