Sachin Tendulkar Wish Indian Women Team: आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी दणदणीत पराभव करत प्रथमच विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ५२ धावांनी धूळ चारत इतिहास रचला. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यानंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा भारत आता चौथा देश ठरला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर क्रिकेट विश्वातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी भारतीय महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही आपला आनंद व्यक्त करताना, या विजयाची तुलना १९८३ च्या विश्वचषकाशी केली.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघाने १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच आयसीसी वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. यानंतर सचिन तेंडुलकरने १९८३ च्या वर्ल्ड कपचा संदर्भ देत भारतीय महिला संघाच्या विजयाचं कौतुक केले.
"१९८३ च्या विश्वचषकाने एका संपूर्ण पिढीला मोठी स्वप्ने पाहायला आणि ती साकार करायला प्रेरित केले. आज, आपल्या महिला संघाने खऱ्या अर्थाने काहीतरी खास केले आहे. त्यांनी देशातील असंख्य युवा मुलींना बॅट आणि बॉल उचलून मैदानात उतरण्याची आणि एक दिवस आपणही ट्रॉफी उचलू शकतो, हा विश्वास ठेवण्याची प्रेरणा दिली आहे. हा भारतीय महिला क्रिकेटच्या प्रवासातील निर्णायक क्षण आहे!” असं सचिन तेंडुलकरने म्हटले.
विराट कोहलीनेही आपला आनंद व्यक्त केला. “या मुलींनी इतिहास रचला आहे आणि एक भारतीय म्हणून मला खूप अभिमान वाटतोय. इतक्या वर्षांची मेहनत आज फळाला आली. हरमनप्रीत आणि संपूर्ण टीमचे ऐतिहासिक कामगिरीबद्दल खूप अभिनंदन. हा क्षण आपल्या देशातील असंख्य मुलींना खेळ स्वीकारण्याची प्रेरणा देईल. जय हिंद!” असं विराटने म्हटले.
दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २९९ धावांचे आव्हान ठेवले होते. शफाली वर्मा (८७ धावा) आणि स्मृती मानधना (४५ धावा) यांनी दिलेल्या धडाकेबाज सलामीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली. शफालीची ही खेळी संघासाठी 'मॅचविनर' ठरली. गोलंदाजीत दीप्ती शर्मा हिने अचूक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखले आणि कर्णधार लॉरा वुल्व्हर्टचे शतक (१०१ धावा) व्यर्थ ठरवले. टीम इंडियाने आपला जुना रेकॉर्ड मोडीत काढत, उपविजेतेपदावर समाधान मानण्याची वेळ यंदा येऊ दिली नाही आणि ५२ धावांनी हा सामना जिंकून इतिहास घडवला.