T20 World Cup 2024 : अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर ( Saurabh Netravalkar ) याची या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जोरदार चर्चा आहे. त्यात त्याने भारताशी नाते असल्याचे त्याच्या प्रवासाबाबत जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. पाकिस्तानविरुद्ध १८ धावांत २ बळी घेतल्यानंतर, सुपर ओव्हरमध्ये त्याने १८ धावांचा बचाव केला. तेच भारताविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची विकेट मिळवून त्याने स्पर्धेवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. नेत्रावळकर स्वत:च्या मेहनतीने त्याला इथपर्यंत पोहोचवले आहे. सौरभ हा केवळ क्रिकेटपटूच नाही तर तो ओरॅकलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि खूप चांगला गिटार वादक आणि गायक देखील आहे.
या सर्व गोष्टींमुळे भारत विरुद्धच्या सामन्यानंतर असे काही घडले ज्याने चाहत्यांनाही धक्का बसला. भारताच्या अर्शदीप सिंगला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने ४-०-९-४ अशी विक्रमी स्पेल टाकली आणि भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. पण सौरभची क्रेझ इतकी होती की ११ पत्रकारांनी अर्शदीप सिंगच्या पत्रकार परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आणि सर्वजण सौरभची १० मिनिटांची मुलाखत घेण्यासाठी धावले.
नियमित पत्रकार परिषद आणि मॅचनंतरच्या कॉन्फरन्सशिवाय, आयसीसी मिश्र झोनमध्ये पत्रकारांना खेळाडूंना प्रश्न विचारण्याची संधी देते. त्यासाठी सौरभ तेथे उपस्थित होता आणि कोणत्याही पत्रकाराने ही संधी सोडली नाही. अर्शदीप सिंगची पत्रकार परिषद फक्त ४ मिनिटे चालली. पत्रकारांनी सौरभला एकूण ११ मिनिटे प्रश्न विचारले.
अमेरिकन संघ पहिल्यांदाच मोठ्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत आहे. अमेरिकन चाहत्यांनीही या खेळात मोठी उत्सुकता दाखवली आहे. भारतीय संघ आधीच सुपर ८ मध्ये पोहोचला आहे. तर अमेरिकन संघ त्या मार्गावर आहे. अमेरिकेला पुढच्या सामन्यात आयर्लंडशी सामना करायचा आहे. अमेरिकन संघाने हा सामना जिंकला तर संघ सुपर ८ मध्ये पोहोचेल. या सामन्यावर पावसाचे संकट आहे आणि जर हा सामना पावसामुळे वाहून रद्द झाला तर पाकिस्तानचे नुकसान होईल आणि संघ सुपर ८ मधून बाहेर पडेल.