भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे ६६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे ते सदस्य होते. यशपाल यांच्या निधनाचे वृत्त समजताच ८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांना अश्रू अनावर झाले. एका चॅनेलशी बोलताना ते रडले अन् मागील आठवड्याच यशपाल यांची भेट झाली होती असे त्यांनी सांगितले. कपिल देव, अंशूमन गायकवाड, दिलीप वेंगसरकर यांच्यासह सचिन तेंडुलकर आणि अनेक क्रिकेटपटूंनी यशपाल शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली...
बिनधास्त, बेधडक!; यशपाल शर्मा यांची १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ती' अविस्मरणीय खेळी अन् टीम इंडिया फायनलमध्ये, Video
कपिल देव म्हणाले, ''हे सत्य नाही, असे मला अजूनही वाटतेय.. मला काहीच सुचत नाहीए.. मागील आठवड्यातच आम्ही भेटलो होतो आणि त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत दिसत होती. आम्ही सर्वांनी सोबत बऱ्याच गप्पा गोष्टी केल्या. देवाच्या मर्जीसमोर आपण काहीच करू शकत नाही. हा पण मी आज देवाला नक्की विचारेन की असं करू नको...खूप विचित्र वाटतंय, मी स्वतःला सांभाळू शकत नाही. मी आता मुंबईत आहे आणि फ्लाईट पकडून थेट दिल्लीला चाललो आहे. तुझ्या आत्म्याला शांती मिळो. वी लव्ह यू यश.''
अंशूमन गायकवाड म्हणाले की, ''यशपाल शर्मा गेला यावर विश्वास बसत नाहीत. मी त्याला 'बदाम' म्हणायचो.'' माजी निवड समिती प्रमुख दिलीप वेंगसरकर म्हणाले,''मागील आठवड्यात आमची भेट झाली होती आणि तो खूप तंदुरुस्त दिसत होता. त्याच्यासोबत असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं.''