IPL 2025 PBKS vs RR : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सच्या संघानं घरच्या मैदानात खेळणाऱ्या श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्ज संघाचा विजय रथ रोखला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानच्या संघानं निर्धारित २० षटकात ४ बाद २०५ धावा करत पंजाबसमोर २०६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून फक्त नेहल वढेरा ६२ (४१) आणि ग्लेन मॅक्सवेल ३० (२१) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. सलग दोन सामन्यातील विजयानंतर पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे सलग दोन पराभवातून सावरणाऱ्या राजस्थानच्या संघाने सलग दुसरा विजय नोंदवत आपल्या खात्यात २ गुण जमा केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् संजून मोडला शेन वार्नचा रेकॉर्ड
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिल्या तीन सामन्यात रियान पराग राजस्थान संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. चौथ्या सामन्यात नियमित कर्णधार संजू सॅमसन याने कॅप्टन्सीची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली. या सामन्यातील विजयासह तो राजस्थान रॉयल्स संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान फ्रँचायझी संघाला जेतेपद मिळवून देणाऱ्या दिवंगत अन् दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नचा रेकॉर्ड मोडित काढत संजूनं नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघानं ३२ वा सामना जिंकला आहे.
PBKS vs RR : आधी ड्रेसिंग रुममध्ये झोप काढली; मग जोफ्रानं पहिल्याच ओव्हरमध्ये दोघांना केलं 'बोल्ड'
राजस्थान रॉयल्स संघाचे यशस्वी कर्णधार अन् त्यांनी जिंकलेले सामने
- ३२- संजू सॅमसन
- ३१- शेन वॉर्न
- १८- राहुल द्रविड
यशस्वीच्या फिफ्टीसह संजू-रियानची दमदार खेळी
पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी रचत संघाला दमदार सुरुवात करून दिली. संजू सॅमसन २६ चेंडूत ३८ धावा करून परतल्यावर यशस्वी जैस्वालनं यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले. तो ४५ चेंडूत ६७ धावा करून बाद झाला. रियान परागनं २५ चेंडूत ४३ धावांची नाबाद खेळी करत संघाची धावसंख्या २०५ धावांपर्यंत नेली. पंजाबच्या ताफ्यातून लॉकी फर्ग्युसन याने २ तर अर्शदीप सिंग आणि मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी एक एक बळी टिपला.
नेहाल लढला, पण शेवटी तो कमी पडला
धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. जोफ्रा आर्चरनं पहिल्याच चेंडूवर प्रियांश आर्य याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी आलेला आणि कमालीच्या फॉर्ममध्ये असणारा पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरही याच षटकात दोन चौकारांच्या मदतीने १० धावा करून बाद झाला. त्यानंतर नेहाल वढेरा याने ४१ चेंडूत केलेल्या ६२ धावा आणि ग्लेन मॅक्सवेलनं २१ चेंडूत ३० धावा करत संघाच्या आशा पल्लवित केल्या. पण ही दोघांची विकेट पडल्यावर पंजाबच्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. निर्धारित २० षटकात संघाला ९ विकेट्सच्या मोबदल्यात १५५ धावांपर्यंत मजल मारता आली. राजस्थानच्या ताफ्यातून जोफ्रा आर्चरनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय संदीप शर्मा आणि तीक्षणाला प्रत्येकी २-२ तर कुमार कार्तिकेया आणि हसरंगानं आपल्या खात्यात प्रत्येकी १-१ विकेट जमा केली.
Web Title: Jofra Archer Strikes Twice First Over After Yashasvi Jaiswal Riyan Parag Hit Show Sanju Samson Lead Rajasthan Royals Won By 44 Runs Against Shreyas Iyer Punjab Kings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.