नवी दिल्ली : यंदा आयपीएलच्या १४ व्या पर्वासाठी (२०२१) खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारीला होऊ शकतो. लिलावाचे स्थळ काही दिवसात निश्चित करण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती वृत्तसंस्थेला शुक्रवारी दिली. आगामी आयोजन भारतात होणार की परदेशात हे बीसीसीआयला निश्चित करायचे आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्थानिक मैदानावर आयपीएल आयोजनाचे प्रयत्न केले जातील,असे काही दिवसांपूर्वी वारंवार सांगितले होते. कोरोनामुळे आयपीएल २०२० यूएईत झाले होते. पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध मालिकेचे भारतात आयोजन होणार असल्याने आयपीएलचे आयोजन भारतात करण्याचा मार्ग काही प्रमाणात मोकळा झाला आहे. सर्व संघांना खेळाडूंना रिटेन करण्याची तारीख २० जानेवारी देण्यात आली होती. ४ फेब्रुवारीपर्यंत खेळाडूंना एका संघातून दुसऱ्या संघात (ट्रेडिंग विंडो)जाता येणार आहे. बऱ्याच संघांनी आपल्या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पाहायला मिळत आहे.