मुंबई : सलामीच्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी मुुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) नमवून चेन्नई सुपरकिंग्जने (Chennai Super Kings) यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये दणक्यात सुरुवात केली. मात्र यानंतर त्यांना सलग दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यात त्यांना आठवडाभरामध्ये एकही सामना खेळावा लागला नाही. त्यामुळे संघाला पूर्ण विश्रांती मिळाली असली, तरी पॉइंट टेबलमध्ये मात्र सीएसकेला तळाच्या स्थानी समाधान मानावे लागत आहे. परंतु, आज होणाऱ्या सामन्यात सीएसके पूर्ण ताकदीने खेळताना दिसेल. कारण संघाचे दोन अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन होत असल्याने संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
तीन वेळचा आयपीएल विजेता संघ सीएसके आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पूर्ण ताकदीने आणि आपल्या जुन्या शैलीत खेळताना दिसू शकेल. कारण संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू आणि त्याचबरोबर सर्वात हुकमी खेळाडूंपैकी एक ड्वेन ब्राव्हो यांचे पुनरागमन होत आहे. रायुडू ॠतुराज गायकवाडच्या जागी खेळताना दिसेल. ॠतुराजला रायुडूच्या जागी खेळण्याची मिळालेली मोठी संधी साधण्यात यश आले नाही. त्यामुळेच त्याच्या जागी रायुडूचे खेळणे जवळपास निश्चित आहे.
दुसरीकडे, अष्टपैलू ब्रावोचे होत असलेले पुनरागमन कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांच्या अनुपस्थितीत ब्राव्होची साथ त्याला फायदेशीर ठरेल. ब्राव्होने दोनवेळा पर्पल कॅप मिळवली असून आयपीएलच्या एका सत्रात सर्वाधिक 32 बळी घेण्याचा त्याचा विक्रम अद्यापही कायम आहे. त्याचप्रमाणे, मोक्याच्यावेळी फटकेबाजी करत सामना फिरवण्यातही ब्राव्होचा हातखंडा आहे.
परंतु, असे असले तरी ब्राव्होला संघात घेताना कोणाला बाहेर बसवायचे, असा प्रश्न धोनीला पडेल. कारण ब्राव्होच्या जागी अंतिम संघात स्थान मिळवलेल्या सॅम कुरनने आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. तीन सामन्यांत मिळून पाच बळी घेतले असून फलंदाजीतही कुरनने छाप पाडली आहे. त्यामुळेच आजच्या सामन्यात सीएसकेच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.