India vs South Africa 2nd ODI : रायपूरच्या मैदानातील सामन्यात किंग कोहलीचे सलग दुसरे शतक आणि ऋतुराज गायकवाडच्या वनडेतील पहिल्या शतकानंतर लोकेश राहुलचा जलवा पाहायला मिळाला. या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आलेल्या भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३५८ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर ३५९ धावांचे टार्गेट सेट केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितसह यशस्वी स्वस्तात फिरले माघारी
दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा कार्यवाहू कर्णधार लोकेश राहुल हा टॉस वेळी पुन्हा कमनशिबी ठरला. टेम्बा बावुमानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मानं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली. संघाच्या धावफलकावर ४० धावा असातना रोहित शर्मा ८ चेंडूत १४ धावा करून तंबूत परतला. नांद्रे बर्गर यानं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर मार्को यान्सेन याने यशस्वी जैस्वालच्या खेळीला ब्रेक लावाला. तो ३८ चेंडूत २२ धावांची खेळी करून परतला.
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
विराट-ऋुतुराज जोडी जमली
सलामीवीर स्वस्तात माघारी फिरल्यावर विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड जोडी जमली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली. ऋतुराज गायकवाडनं वनडेतील पहिले शतक झळकावताना ८३ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०५ धावांची खेळी केली. विराट कोहलीनं सलग दुसरे शतक झळकावताना ९३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १०२ धावांची खेळी साकारली.
अखेरच्या षटकात केएल राहुलसह जड्डूची फटकेबाजी
विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड शतकी खेळी करून माघारी फिरल्यावर लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा या जोडीनं सहाव्या विकेटसाठी ५४ चेंडूत ६९ धावांची भागीदारी रचली. केएल राहुलनं ४३ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या. दुसऱ्या बाजूला जड्डूनं २७ चेंडूत २४ धावांची भर घातली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून मार्को यान्सेन याने सर्वाधिक २ तर लुंगी एनिगडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवली.