भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली. बांगलादेशनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवताना पहिल्याच सत्रात सलामीवीरांना माघारी पाठवले. 2 बाद 12 अशा अवस्थेत सापडलेल्या बांगलादेशसाठी मोमिनूल हक ( कर्णधार) आणि मुश्फिकर रहीम ही जोडी धावली. तत्पूर्वी, मोहम्मद शमीनं बांगलादेशला तिसरा धक्का दिला. ही जोडी अश्विननं तोडली अन् बांगलादेशची अवस्था 4 बाद 99 अशी केली. अश्विननं मोमिनूल ( 37) याला बाद केलं. ही विकेट त्याच्यासाठी विक्रमी ठरली.
घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण करण्यासाठी अश्विनला केवळ एक फलंदाज बाद करावा लागणार होती. मोमिनूलची विकेट घेत त्यानं तो पल्ला गाठला. घरच्या मैदानावर 250 कसोटी विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अनील कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी हा विक्रम केला आहे. घरच्या मैदानावर अनील कुंबळेच्या नावावर 350, तर हरभजन सिंगच्या नावावर 265 विकेट्स आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांत अश्विन चौथ्या स्थानावर आहे. कुंबळे 619 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ कपिल देव 434 आणि हरभजन 417 विकेट्ससह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. अश्विनच्या नावावर 358 विकेट्स आहेत.
घरच्या मैदानावर सर्वात जलद 250 विकेट्स घेत अश्विननं श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याच्याशी बरोबरी केली. या दोघांनी घरच्या मैदानावर 42 कसोटींत 250 विकेट्स घेतल्या.
सर्वात जलद 250 विकेट्स
42 सामने मुथय्या मुरलीधरन/ आर अश्विन
43 सामने अनील कुंबळे
44 सामने रंगना हेराथ
49 सामने डेल स्टेन
51 सामने हरभजन सिंग