दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह भारताच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताने एकूण २०१ सामने गमावले असून त्यांनी सर्वाधिक सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संघासमोर गमावले आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध प्रत्येकी १२ सामने गमावले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत एकूण ३३ सामने खेळले आहेत. त्यापैकी, एकूण १३ सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलिया (एकूण सामने-३७) आणि इंग्लंड (एकूण सामने-२९) यांच्याविरुद्ध प्रत्येकी १२ सामने गमावले आहेत. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजविरुद्ध टी-२० सामन्यात भारताला प्रत्येकी १० सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
भारताचा लाजिरवाणा पराभव
द.आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला ५१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २० षटकांत चार विकेट्स गमावून २१३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डीकॉकने ४६ चेंडूत ९० धावांची धमाकेदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली. भारताचा युवा फलंदाज तिलक वर्मा (६२ धावा) व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला. या पराभवासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबर रोजी खेळला जाईल.
पराभवानंतर सूर्यकुमार काय म्हणाला?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सूर्यकुमार यादव म्हणा की, "या सामन्यात आम्ही प्रथम गोलंदाजी केली. परंतु, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखू शकलो नाही. यातून शिकले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. मला वाटते की, शुभमन आणि मला फलंदाजीची जबाबदारी घ्यावी लागेल, कारण आपण नेहमीच अभिषेकवर अवलंबून राहू शकत नाही, कारण त्याचाही दिवस वाईट ठरू शकतो. शुभमन, मी आणि इतर फलंदाजांना ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. आपण या चुकांमधून शिकले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे."