IND vs SA 2nd Test Ravi Shastri Fearless Advice For Team India : गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाने पहिल्या डावात ४८९ धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाच्या खेळात तगडी फलंदाजी करून अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकण्याचे आव्हान टीम इंडियासमोर उभे राहिले आहे. हा सामना जिंकण्यासाठी माजी क्रिकेटर आणि कोच रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला अजब गजब सल्ला दिला आहे. गुवाहाटी कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची असेल तर प्रतिस्पर्धी संघाला आघाडी देण्याची चाल खेळायला हवी, असे शास्त्रींनी म्हटले आहे. नेमकं ते काय म्हणाले आहेत? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय म्हणाले शास्त्री?
रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सवरील खास शोमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचे विश्लेषण करताना म्हटले आहे की, या सामन्यात तिसऱ्या दिवशीचा खेळ महत्त्वाचा असेल. नव्या चेंडूवर उत्तम फलंदाजी करुन डाव पुढे नेताना भारतीय संघाला काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. ४८९ धावा करुन आघाडी घेण्यात खूप वेळ जाईल. त्यापेक्षा ८० ते १०० धावांनी पिछाडीवर असताना डाव घोषित करण्याची जोखीम कदाचित संघासाठी हितकारक ठरू शकते. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला कमी धावांत आटोपून चौथ्या डावात भारतीय संघाला विजयी डाव साधता येईल, असे मत त्यांनी मांडले आहे.
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
टीम इंडियाने ४ वेळा खेळलीये ही चाल, त्यात एक पराभव अन् ...
कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात ३३ पैकी फक्त ३ वेळा पिछाडीवर असताना डाव घोषित करून संघाला विजय मिळाला आहे. यात भारतीय संघाने फक्त ४ वेळा पिछाडीवर असताना डाव घोषित केला आहे. यात एकदाही टीम इंडियाला विजय मिळालेला नाही. १९४८ मध्ये टीम इंडिाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत १०३ धावांनी पिछाडीवर असताना डाव घोषित केला होता. यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय पाकिस्तानविरुद्धच्या फैसलाबाद (१९७८) कसोटीत ४१ धावांनी पिछाडीवर असताना टीम इंडियाने डाव घोषित केला होता. इंग्लंडविरुद्धच्या कानपूर कसोटीसह (१९८२) नागपूर कसोटीत (२०१२) अनुक्रमे १ आणि ४ धावांनी पिछाडीवर असताना भारतीय संघाने डाव घोषित केला होता. हे तिन्ही सामने अनिर्णित राहिले होते.