IND vs NZ 1st ODI Shreyas Iyer Rocket Throw : भारतीय संघाचा मध्यफळीतील भरवशाचा खेळाडू श्रेयस अय्यर याने दुखापतीतून सावरत न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. वडोदरा येथील मैदानात रंगलेल्या पहिल्या सामन्यात फलंदाजीतील धमक दाखवण्याआधी तो क्षेत्ररक्षणात चमकला. एक झेल टिपत कुलदीप यादवला विकेट मिळवून देण्यात हातभार लावणाऱ्या श्रेयस अय्यरनं रॉकेट थ्रोसह न्यूझीलंडचा कर्णधार मायकेल ब्रेसवेल (Michael Bracewell) याचा खेळ खल्लास केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अय्यरचा रॉकेट थ्रो अन् टीम इंडियाला मिळाली महत्त्वाची विकेट
१९८ धावांवर न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी कर्णधार मायकेल ब्रेसवेलसह डॅरिल मिचेल या दोघांवर होती. अखेरच्या टप्प्यात ही जोडी टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकली असती. श्रेयस अय्यरनं अप्रतिम क्षेत्ररक्षण करत ही जोडी फोडली. हर्षित राणाने ब्लॉकहोलमध्ये वेगवान चेंडू टाकला. मिचेलने तो लाँग-ऑनकडे खेळला. एक धाव पूर्ण केल्यावर ब्रेसवेलने दुसऱ्या धावेसाठी कॉल केला. मात्र सीमारेषेवरून श्रेयस अय्यर वेगाने चेंडूवर आला अन् त्याने नॉन-स्ट्रायकर एंडला रॉकेट थ्रो मारत न्यूझीलंडच्या कर्णधाराला तंबूचा रस्ता दाखवला. ब्रेसवेलनं १८ चेंडूत १६ धावा केल्या.
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
दुखापतीनंतर बऱ्याच दिवस संघाबाहेर होता, देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमक दाखवली अन् ...
ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेत श्रेयस अय्यर क्षेत्ररक्षण करतावेळीच गंभीर जखमी झाला होता. परिणामी त्याला हा दौरा निम्म्यावर सोडावा लागला. एवढेच नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील मालिकेलाही तो मुकला. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी संघात उप कर्णधार म्हणून त्याची पुन्हा निवड झाली. पण प्लेइंग इलेव्हमधील त्याचे स्थान फिटनेसवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयने संघ निवडीवेळी स्पष्ट केले होते. अय्यरनं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून मैदानात उतरत बॅटिंगमधील क्लास दाखवत फिटनेस दाखवला अन् न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी तो संघात फिट झाला. फलंदाजीआधी 'सरपंच साब'नं क्षेत्ररक्षणात दाखवलेला तोरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.