कोलकाता : गुलाबी रंगात रंगलेल्या इडन गार्डन्सवर राजकारण तसेच क्रिकेटमधील अनेक दिग्गजांच्या साक्षीने भारतीय क्रिकेटमधील गुलाबी क्रांतीला शुक्रवारी सुरुवात झाली. विराट सेनाने मैदानावर पाऊल टाकताच उपस्थित चाहत्यांनी टाळ्यांचा गजर करीत ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ सौरव गांगुलीचे स्वप्न साकार झाल्याची प्रचिती दिली.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. दोघींनी सामन्याची सुरुवात करण्यासाठी इडनवर घंटा वाजविली तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. सामन्यातील पहिल्या चार दिवसांची तिकिटे संपल्याने मूळ किमतीपेक्षा पाचपट किमतीत तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. अनेक प्रेक्षक गुलाबी रंगाच्या कपड्यांत आल्यामुळे येथे सामना नसून मेळावा लागल्याचे जाणवत होते. असाच उत्साह भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात २००१ मध्ये झालेल्या कसोटीदरम्यान पाहायला मिळाला होता.
बीसी रॉय क्लब हाउसमध्ये पाहुण्यांच्या स्वागतासाठी ‘गुलाबी कार्पेट’ अंथरण्यात आले. जवळपास ५० मैदानी कर्मचाऱ्यांनी गुलाबी कपडे घातले आहेत. एक मोठा गुलाबी फुगा हवेत डौलाने डोलत आहे. शेख हसीना आणि ममता बॅनर्जी यांचे आगमन होताच पोलीस बँडने त्यांचे स्वागत केले. सोबत बंगाल क्रिकेट संघटनेचे सचिव अभिषेक दालमिया होते. उभय नेत्यांनी दोन्ही संघांतील खेळाडूंचा परिचय करून घेतला. या वेळी बांगलादेशकडून पहिली कसोटी खेळणारे माजी खेळाडूदेखील उपस्थित होते. नाणेफेकीसाठी चांदीचे नाणे वापरण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत झाले. पॅरा ट्रूपरकडून गुलाबी चेंडू देण्याची योजना मात्र ऐनवेळी रद्द करण्यात आली. (वृत्तसंस्था)
मान्यवरांचा गौरव!
सचिन तेंडुलकरसह, ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, चॅम्पियन शटलर पी. व्ही. सिंधू, टेनिसपटू सानिया मिर्झा, बॉक्सर एमसी मेरीकोम, माजी क्रिकेटपटू कपिलदेव, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझहरुद्दीन, के. श्रीकांत, फारुख इंजिनियर, चंदू बोर्डे, सदागोपन रमेश, साबा करीम, सुनील जोशी, अजित आगरकर, व्यंकटेश प्रसाद हे भारतीय खेळाडू तसेच बांगलादेशचा पहिला कसोटी कर्णधार नईमूर रहमान याच्यासह मोहम्मद महमुदुल्लाह हसन, मेहराब हुसेन, मोहम्मद हसीबुल हुसेन, काझी हबीबूल बशर, आणि मोहम्मद अक्रम खान आदींचीही यावेळी उपस्थिती होती.
पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सचिन, द्रविड व कपिलदेव यांच्यासह भारताच्या माजी कर्णधारांचा सन्मान करण्यात आला. बंगाल क्रिकेट संघटनेने या सामन्यासाठी बांगलादेशकडून २००० साली भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळलेल्या क्रिकेटपटूंनाही निमंत्रित केले होते. त्याचप्रमाणे पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचाही बीसीसीआयच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.