ठळक मुद्देऑस्ट्रेलिया, बांगलादेश यांच्यानंतर टीम इंडियानं न्यूझीलंडलाही हार मानण्यास भाग पाडले. भारतानं हा सामना 4 धावांनी जिंकला.
ICC Women's T20 World Cup : भारतीय महिला संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश यांच्यानंतर टीम इंडियानं न्यूझीलंडलाही हार मानण्यास भाग पाडले. शेफाली वर्माच्या फटकेबाजीनंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावताना संघाला विजय मिळवून दिला. भारतानं हा सामना 4 धावांनी जिंकला. भारतीय संघ आज चार फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरला होता आणि ही रणनीती उपयोगी ठरली. न्यूझीलंडच्या अॅमेली केरनं अखेरच्या दोन षटकांत तुफान फटकेबाजी करून सामन्यात चुरस निर्माण केली होती.
टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक अन् उपांत्य फेरीची पात्रता निश्चित
पुन्हा एकदा शेफाली वर्मा टीम इंडियासाठी तारणहार ठरली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शेफालीनं 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, परंतु अन्य फलंदाजांनी अपयशाचा कित्ता गिरवला. या सामन्यात स्मृती मानधनाचे पुनरागमन झाले. तापामुळे तिला दुसऱ्या लढतीत मुकावे लागले होते. स्मृतीनं चौकार खेचून धावांचे खाते उघडले खरे, परंतु तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ली ताहूहूच्या गोलंदाजीवर ती त्रिफळाचीत झाली. 10व्या षटकात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. अॅमेलिया केरनं पहिल्याच चेंडूवर तानिया भाटीयाला बाद केले. तानिया आणि शेफाली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. तानियानं 23 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. शेफालीनं 34 चेंडूंत 46 धावा केल्या. त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. भारताला 8 बाद 133 धावांवर समाधान मानावे लागले.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 34 धावांत 3 धक्के बसले. शिखा पांडे, दीप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी पहिल्या दहा षटकांत किवींना हे धक्के दिले. कॅटी मार्टीन आणि मॅडी ग्रीन यांनी चौथ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. पण, राजेश्वरी गायकवाडने ही जोडी तोडली. तिनं ग्रीनला ( 24) बाद केले. राधा यादवनं घातली मार्टीनला बाद करून भारताला मोठं यश मिळवून दिलं. मार्टीननं 25 धावा केल्या. अॅमेली केरनं 19व्या षटकात पूनम यादवच्या गोलंदाजीवर 18 धावा चोपून काढल्या. केरनं चार चौकार खेचले, परंतु तिला अखेरच्या 6 चेंडूंत विजयासाठीच्या 16 धावा करता आल्या नाही. न्यूझीलंडला 20 षटकांत 6 बाद 129 धावांवर समाधान मानावे लागले.
सामन्यात 46 धावा करणाऱ्या शेफालीला वुमन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला. या सामन्यात शेफालीनं विश्वविक्रमाला गवसणी घातली. महिलांच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक स्ट्राईक रेटनं धावा करण्याचा विक्रम शेफालीनं नावावर केला. तिनं तीन सामन्यांत 172.72 च्या स्ट्राईक रेटनं 114 धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेटच्या बाबतित तिच्या आसपासही कुणी नाही.
तीन सामन्यांतील कामगिरीवि. ऑस्ट्रेलियाः 15 चेंडूंत 29 धावा, 193.33 स्ट्राईक रेट
वि. बांगलादेशः 17 चेंडूंत 39 धावा, 229.41 स्ट्राईक रेट
वि. न्यूझीलंडः 34 चेंडूंत 46 धावा, 135.29 स्ट्राईक रेट
भारत-पाकिस्तान अन् शारजाहच नातं पुन्हा जुळणार; मार्चमध्ये क्रिकेटचा महामुकाबला होणार
Video : क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी बनला शेतकरी; करतोय सेंद्रीय शेती
IPL 2020 : विराट कोहली ते एबीडी... जाणून घ्या, कोणाला किती 'पगार' देते RCB!
Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचारावर रोहित शर्मानं व्यक्त केली चिंता, म्हणाला...
सराव सत्रात टीम इंडियाचा ओपनर दुखापतग्रस्त; विराट कोहली त्रस्त
Sunrisers Hyderabad संघाकडून Breaking News; कर्णधारपदाची माळ स्फोटक फलंदाजाकडे