icc 2021 t20 world cup in india icc interim ceo geoff allardice says we have backup plans | मोठी बातमी! भारतातून टी-२० वर्ल्डकप इतरत्र हलवणार? , ICC नं केलं मोठं विधान, BCCI ची चिंता वाढली!

मोठी बातमी! भारतातून टी-२० वर्ल्डकप इतरत्र हलवणार? , ICC नं केलं मोठं विधान, BCCI ची चिंता वाढली!

ICC T20 World Cup, 2021: भारतात यंदाच्या वर्षाच्या शेवटाला आंतरराष्ट्रीय टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं (2021 T20 World Cup) आयोजन होणार आहे. पण देशात सातत्यानं वाढत्या कोरोना रुग्णांच्या परिस्थितीमुळे स्पर्धेच्या भारतातील आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. त्यात आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्यावतीनं (ICC) करण्यात आलेलं विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) चिंता वाढवणारं ठरणार आहे. 

महेंद्रसिंग धोनीचा CSK संघ यंदाही प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाही; गौतम गंभीरचा दावा

आयसीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जोफ अलार्डिस यांनी यंदाच्या वर्षात भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी 'बॅकअप प्लान' तयार असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे आयसीसीकडून टी-२० वर्ल्डकप इतरत्र हलविण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, देशात कोरोना वाढत असला तरी टी-२० वर्ल्डकप भारतातून हलवून दुसऱ्या ठिकाणी नेण्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

अनुष्कानं विराटला हात पकडून उचललं; कोहलीच्या तोंडून पटकन निघालं...

टी-२० वर्ल्डकपचं आयोजन ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये केलं जाणार आहे. पण गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. पण असं असतानाही देशात आयपीएल स्पर्धा प्रेक्षकांविना खेळविण्याची तयारी बीसीसीआयनं केली आहे. शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात देखील होत आहे. त्याच धर्तीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येही वर्ल्डकप स्पर्धेचंही आयोजन केलं जाईल असा विश्वास बीसीसीआयला आहे. 

आयसीसीचे सीईओ काय म्हणाले?
"टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या निर्धारित योजनेनुसारच आम्ही सध्या पुढे जात आहोत. पण आमच्याकडे बॅकअप प्लान देखील तयार आहे. पण त्या गोष्टींवर सध्या आम्ही विचार करत नाहीय. बीसीसीआयसोबत आमची चर्चा सुरू आहे. गरज पडल्यास बॅकअप योजनेवर काम केलं जाईल", असं जोफ अलार्डिस यांनी सांगितलं. ५३ वर्षीय अलार्डिस हे ऑस्ट्रेलियासाठी स्थानिक क्रिकेट खेळले आहेत. कोविड काळात क्रिकेट कसं खेळवलं जातंय हे समजून घेण्यासाठी आयसीसी इतर देशांच्या क्रिकेट बोर्डाशी देखील संपर्कात असल्याचं ते म्हणाले. 

...तर यूएईमध्ये होईल टी-२० वर्ल्डकप
"सध्या अनेक देशांमध्ये क्रिकेट खेळवलं जात आहे. आम्ही सातत्यानं क्रिकेट बोर्डांशी संपर्कात आहोत. आम्ही सध्या चांगल्या स्थितीत आहोत आणि सकारात्मक पद्धतीनं याकडे पाहत आहोत. दोन महिन्यात कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीचाही सामना खेळवला जाणार आहे", असं अलार्डिस म्हणाले. 

गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) आयपीएल स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर भारतात टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन होऊ शकलं नाही. तर यूएईमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ शकतं असा आयसीसीचा बॅकअप प्लान असल्याचं बोललं जात आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: icc 2021 t20 world cup in india icc interim ceo geoff allardice says we have backup plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.