क्रिकेटच्या मैदानात दोन भाऊ एकत्र एका संघाकडून खेळल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण इतिहासात पहिल्यांदाच बाप लेकाची जोडी एका संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (BPL) नोआखली एक्सप्रेस या फ्रँचायझी संघाकडून स्टार क्रिकेटर आपल्या मुलासोबत फलंदाजी करताना दिसला. एवढेच नाही तर दोघांनी अर्धशतकी भागीदारीसह संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपू्ण भूमिकाही निभावली. कोण क्रिकेटच्या मैदानात एकत्र मैदानात उतरणारी बाप लेकाची पहिली जोडी? जाणून घेऊयात सविस्तर...
स्टार क्रिकेटरनं लेका डेब्यू कॅप दिली अन् त्याच्यासोबत बॅटिंग करत इतिहासही रचला
बांगलादेश प्रीमियर लीगमधील सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार मोहम्मद नबी आणि त्याचा मुलगा हसन इसाखिल नोआखली एक्सप्रेस संघासाठी एकत्र खेळताना दिसले. सामन्याआधी नबीनं आपल्या मुलाला पदार्पणाची कॅप दिली. वडिलांच्या हस्ते कॅप स्विकारल्यावर या पठ्ठ्यानं पदार्पणाच्य सामन्यात ९२ धावांसह धमाकेदार खेळीसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. एवढेच नाही तर या सामन्यात त्याने वडिलांसोबत बॅटिंग करत इतिहासही रचला. क्रिकेटच्या मैदानात बाप लेकाची जोडी मैदानात उतरल्याची ही पहिलीच वेळ ठरली.
लेकाचं शतक हुकलं, पण बापासोबत अर्धशतकी भागीदारीसह रचला इतिहास
रविवारी सिल्हेट येथे ढाका कॅपिटल्सविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात इसाखिल याचे शतक अवघ्या ८ धावांनी हुकले. पण २० वर्षीय फलंदाजाने आपल्या ४० वर्षीय वडिलांच्या साथीनं या सामन्यात चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी रचली. लेकाने पदार्पणाच्या सामन्यात वडिलांच्या साथीनं अर्धशतकी भागीदारी केल्याचा एक नवा विक्रमच या सामन्यात प्रस्थापित झाला आहे.
रहमानुल्लाह गुरबाझनं ऐतिहासिक क्षण केला खास
१४ व्या षटकात नबी क्रीजवर आला आणि बाप लेकाची जोडी एकत्र बॅटिंग करतानाचा ऐतिहासिक क्षण साकार झाला. यावेळी प्रतिस्पर्धी ढाका संघाकडून खेळणारा आणि नबीचा अफगाणिस्तानच्या ताफ्यातील सहकारी रहमानुल्लाह गुरबाझ याने वडील- मुलाला जादुची झप्पी देत या ऐतिहासिक क्षणात आणखी एक खास क्षण जोडल्याचे पायला मिळाले.