Haryana Crime: हरियाणाच्या गुरुग्रामच्या डीएलएफ फेज-२ परिसरात बुधवारी सकाळी एका अत्यंत धक्कादायक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. सकाळी सायकलिंगसाठी निघालेल्या ५८ वर्षीय प्रसिद्ध व्यापारी अमिताभ जैन यांना भरधाव वेगाने आलेल्या सेंट्रो कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात जैन यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी मात्र या घटनेवर संशय व्यक्त करत हा केवळ अपघात नसून ही ठरवून केलेली हत्या असण्याची शक्यता वर्तवली आहे.
बुधवारी सकाळी ७:१५ वाजता डीएलएफ फेज-२ परिसरात ही घटना घडली. मृत अमिताभ जैन यांचे मेडिसिन व्यवसायात एक प्रतिष्ठित नाव होते आणि त्यांना अनेक वर्षांपासून सायकलिंगचा छंद होता. ते रोज सकाळी गुरुग्रामच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सायकल चालवत असत. या घटनेचे जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग झाले आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अमिताभ जैन रस्त्याच्या कडेला सायकल चालवत जात असताना मागून आलेल्या दिल्ली नंबर प्लेटच्या सेंट्रो कारने त्यांना जोरदार धडक दिली.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, अपघात झाला तेव्हा रस्ता पूर्णपणे रिकामा होता आणि कारचा वेगही फार जास्त नव्हता. त्यामुळे आरोपी कार चालक सहजपणे गाडी दुसऱ्या बाजूला वळवू शकला असता. मात्र, त्याने तसे न करता जैन यांना धडक दिली आणि त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून लगेच फरार झाला.
या घटनेनंतर जैन कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचा मुलगा लंडनमध्ये आयटी क्षेत्रात आणि मुलगी बंगळुरूच्या एका मोठ्या कंपनीत काम करते. अमिताभ जैन यांचे कुटुंबीय आणि शेजारी या घटनेला केवळ हिट अँड रन मानण्यास तयार नाहीत. त्यांना या घटनेत कोणताही अपघात नसून, एक सुनियोजित कट असल्याचा दाट संशय आहे.
गुरुग्राम पोलिसांनी तातडीने कारचा नंबर आणि संबंधित पत्ता शोधून काढला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपी कार चालकाचा शोध घेण्यासाठी तपास तीव्र केला आहे. गुरुग्राम पोलिसांचे सांगितले की, "सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मात्र, कुटुंबीयांकडून हत्येची शंका किंवा तशी कोणतीही तक्रार अद्याप पोलिसांना प्राप्त झालेली नाही. पोलीस सर्व तांत्रिक पुराव्यांची तपासणी करत असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल."