IPL च्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेत सुरु करण्यात आलेल्या SA20 च्या चौथ्या हंगामाची धमाकेदार अंदाजात सुरुवात झाली. मुंबई केपटाउन आणि गत हंगामात तळाला राहिलेल्या डरबन सुपर जाएंट्स यांच्यात पहिला सामना खेळवण्यात आला. या सलामीच्या लढतीत दोन्ही संघांनी एकून ४४९ धावा केल्या. SA20 इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या ठरली. याशिवाय IPL मधील हिटमॅन रोहित शर्मासोबतमुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात करणाऱ्या रायन रिकल्टन याने वादळी शतकी खेळीसह लक्षवेधले. पण त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. कारण MI केपटाउन संघाला या सामन्यात १५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रायन रिकल्टनची तुफान फटकेबाजी
रायन रिकल्टन याने SA20 स्पर्धेतील चौथ्या हंगामातील सलामीच्या लढतीत धमाकेदार खेळीक केली. MI केपटाउन संघाच्या डावाची सुरुवात करताना त्याने १७९.३७ च्या स्ट्राईक रेटसह अवघ्या ६३ चेंडूत ११३ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ११ षटकार ठोकले. हे त्याच्या टी20 कारकिर्दीतील दुसरे तर SA20 मधील पहिले शतक ठरले. ११३ ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आहे. याशिवाय त्याच्या नावावर या फॉरमॅटमध्ये २४ अर्धशतकेही आहेत. रीजा हेंड्रिक्ससोबत त्याने ६० धावांची उपयुक्त भागीदारी केली.
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
तिसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूत ७६ धावांची भागादारी
या सामन्यात रायन रिकल्टन याने जेसन स्मिथसोबत तिसऱ्या विकेटसाठी २७ चेंडूत ७६ धावांची भागादारीही रचली. पण अखेरच्या षटकात युवा वेगवान गोलंदाज क्वेना मफाका आणि ईथन बॉश यांनी प्रभावी मारा करत धावांचा वेग रोखला. MI केप टाउनकडून खेळलेल्या ४ हंगामांत २६ सामन्यात रिकल्टन याने ४६.८७ च्या सरासरीसह एकूण १,१२५ धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून रोहितसोबत डावाची सुरुवात कोण करणार?
IPL २०२५ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने रायन रिकल्टन याला १कोटी रुपयांसह आपल्या ताफ्यात घेतले होते. आगामी हंगामासाठी झालेल्या मिनी लिलावाआधी MI नं त्याला रिटेन केले. एवढेच नाही तर मिनी लिलावात त्यांनी क्विंटन डीकॉकवर १ कोटींची बोली लावली. आगामी हंगामात रोहित शर्मासोबत मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रायन रिकल्टन आणि क्विंटन डीकॉक यांच्यात तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.