ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपला. पाच सामन्यांची प्रतिष्ठित अॅशेस मालिका आधीच गमावलेल्या इंग्लंडने तब्बल १५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विजय मिळवत आपली लाज वाचवली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी प्रचंड घाबरलेला तोच मॅचचा हिरो ठरला
पण तुम्हाला माहिती आहे का? ज्या खेळाडूच्या मनात क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार सुरू होता आणि जो बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी प्रचंड घाबरलेला होता, तोच खेळाडू इंग्लंडसाठी विजयाचा शिल्पकार ठरला. तो हिरो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून जोश टंग आहे. चौथ्या कसोटीत टंगने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात २ विकेट्स घेत इंग्लंडच्या विजयाची पायाभरणी केली. त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या जोरावरच बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने कांगारूंना त्यांच्या घरच्या मैदानावर धूळ चारली.
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
त्याच्या डोक्यात निवृत्तीही विचार घोळत होता, पण...
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगलेल्या बॉक्सिंग डे टेस्ट आधी प्रंचड घाबरलो होतो, ही गोष्ट जोश टंगनं मॅचनंतर बोलून दाखवली. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचारही केला होता, असा खुलासाही इंग्लंडच्या गोलंदाजाने केला आहे. बराच काळ तो दुखापतींमुळे त्रस्त होता. याच कारणामुळे निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. पण दुखापतीतून सावरल्यावर कठोर मेहनत घेत त्याने नकारात्म विचार मागे टाकत पुन्हा जोमाने मैदानात उतरण्याचा निर्धार केला.
मॅचनंतर नेमकं काय म्हणाला जोश टंग
अॅशेस मालिकेतील चौथ्या सामन्यातील विजयानंतर जोश टंग म्हणाला की,
मी क्रिकेटमध्ये टिकून राहिलो याचा मला खूप आनंद आहे. काही दिवसांपूर्वी माझं शरीर मला साथ देत नव्हतं आणि मी निवृत्तीबाबत विचार करत होतो. पण मी परतण्याचा निर्णय घेतला आणि आज इंग्लंडसाठी खेळतोय, याचा मला अभिमान आहे. बॉक्सिंग डे टेस्ट आधी घाबरलो होतो. या परिस्थितीत मैदानात उतरून पाच विकेट्स घेणं आणि एमसीजीच्या ऑनर्स बोर्डवर माझं नाव पाहणं हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे.
पहिल्या दिवशी २० विकेट्स! दुसऱ्या दिवशी इंग्लंडने साधला विजयाचा डाव
एमसीजीवर खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग-डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १५२ धावांत आटोपला होता. त्यानंतर इंग्लंडची अवस्था तर त्यांच्यापेक्षा बिकट झाली. ऑस्ट्रेलियाने पलटवार करत इंग्लंडचा पहिला डाव ११० धावांत संपुष्टात आणला. पहिल्या दिवशी २० विकेट्स पडल्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात १३२ धावांत ऑल आउट झाला. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला १७८ धावांचे आव्हान मिळाले. ते त्यांनी ६ विकेट्स राखून पार केले. ज्या खेळाडूने निवृत्तीचा विचार केला होता, तोच इंग्लंडसाठी आशेचा किरण ठरला.