Auqib Nabi Bowled Vaibhav Suryavanshi १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी आपल्या स्फोटक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. IPL मध्ये ३५ चेंडूतील विक्रमी शतकानंतर त्याने वेगवेगळ्या स्पर्धेत आपला धडाका सुरु ठेवल्याचे पाहायला मिळाले. सातत्यपूर्ण चर्चेत असलेल्या वैभव सूर्यवंशीला आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघातही स्थान मिळाले आहे. टीम इंडियाकडून धमाक्यावर धमाका करणारा वैभव सूर्यवंशी देशांतर्गत टी-२० स्पर्धेत संघर्ष करताना दिसत आहे. बिहारच्या संघाकडून खेळताना त्याच्या बॅटला 'ग्रहण' लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जम्मू काश्मीरविरुद्धच्या सामन्यात फ्लॉप शो!
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धेत वैभव सूर्यवंशी बिहारच्या संघाकडून खेळताना दिसत आहे. पण या स्पर्धेत तो सातत्याने अपयशी ठरताना दिसला. जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी अवघ्या ५ धावांवर बोल्ड होऊन तंबूत परतला. विकेट गमावल्यावर त्याच्या चेहऱ्यावर निराशाही अगदी स्पष्ट दिसून आली.
वैभव सूर्यवंशी बोल्ड झालेला व्हिडिओ व्हायरल
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर बिहार विरुद्ध जम्मू–कश्मीर यांच्यात साखळी फेरीतील सामना खेळवण्यात आला. बिहारच्या डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यवंशी ७ चेंडूचा सामना करून अवघ्या ७ धावांवर तंबूत परतला. जम्मू–कश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीने त्याला कमालीच्या चेंडूवर बोल्ड केले. आकिबचा वेगवगान चेंडूवर लेग स्टंप अक्षरशः दोन तीन फूटावर जाऊन पडल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
सलग तिसऱ्या सामन्यात पदरी पडली निराशा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सलग तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशी अपयशी ठरला. याआधी तो चंदीगढविरुद्ध १४ धावा आणि मध्य प्रदेशविरुद्ध १३ धावांवरच त्याचा खेळ खल्लास झाला होता. सामन्याबद्दल बोलायचं तर जम्मू काश्मीर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १५९ धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशीच्या फ्लॉप शोनंतर त्याचा संघ निर्धारित २० षटकांत ९ विकेट्सच्या मोबदल्यात १२५ धावांपर्यंतच मजल मारू शकला.